देशात स्वस्त उपचारांचा कायदा लवकरच आणणार

0

सुरत । 15 वर्षानंतर आमच्या सरकारने राष्ट्रीय आरोग्य धोरण राबवले असून 700 हून अधिक औषधे व स्टेंटचे दर कमी केल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला आहे. या मुळे औषध कंपन्या माझ्यावर नाराज असून माझ्या कामामुळे दररोज कोणी ना कोणी नाराज होत राहणारच असा टोलाही त्यांनी लगावला. पंतप्रधान मोदी यांनी सूरतमध्ये मल्टीस्पेशलिटी रुग्णालय, डायमंड प्लान्टचे उद्घाटन केले.

औषधनिर्मात्यांची मनमानी रोखली
रुग्णालयाचे उद्घाटन माझ्या हस्ते झाले असले तरी रुग्णालयात कोणालाही येण्याची गरज पडू नये असे ते म्हणाले. केंद्र सरकारने औषध निर्मात्यांच्या मनमानीवर चाप लावल्याचे मोदींनी आवर्जून नमूद केले. सूरतसोबत माझे भावनिक नाते आहे. मला पंतप्रधानपदाची उमेदवारी मिळाल्यावर मी सर्वप्रथम सुरतमध्येच आलो होतो. मी गुजरातमध्ये असताना नेहमी म्हणायचो की ज्या कामाचे भूमीपूजन करतो त्याचे उद्घाटनही करणार तेव्हा अनेकांनी हा माझा अहंकार असल्याची टीका केली. इस्त्रायल आणि गुजरातमधील हिरेव्यापार्‍यांच्या संबंधांनाही त्यांनी उजाळा दिला. लवकरच पंतप्रधान मोदी इस्त्रायल दौर्‍यावर जाणार आहेत. या दौर्‍यानंतर आपण हिरे व्यापार्‍यांना दिलासा देऊ शकू असे ते म्हणाले.

400 कोटींचा प्रकल्प
कतारगाममधील किरण मल्टीस्पेशलिटी रुग्णालय पाटीदार समाजाच्या ट्रस्टने बांधले आहे. 400 कोटी रुपये खर्च करुन हे रुग्णालय उभारण्यात आले. याप्रसंगी मोदींनी आरोग्य क्षेत्रातील विविध योजनांचा पाढा वाचला. स्वस्तात उपचार मिळावे यासाठी लवकरच कायदा तयार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. आरोग्य क्षेत्रातील आव्हाने मोठी असल्याचेही यावेळी मोदी यांनी मान्य केले.