मुंबई । राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने ‘संविधान वाचवा, देश वाचवा’, या सुरू करण्यात आलेल्या अभियानांतर्गत 20 जून 2018 रोजी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये संविधान बचाव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती राष्ट्रीय अध्यक्षा फौजिया खान यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. आजवर आपला देश समता, बंधुत्व, धर्मनिरपेक्षता, न्याय या संविधानिक तत्त्वांना जपत वाटचाल करत आला आहे. मात्र, आज याच तत्त्वांची पायमल्ली होताना दिसत आहे. हम करे सो कायदा, अशी हुकूमशाही पद्धत देशात रुजवली जात आहे. या सगळ्या गोष्टींचा विरोध केला तर आवाज दाबला जात आहे. हे देशासाठी धोकादायक आहे, असा आरोप फौजिया खान यांनी केला.
मूळ प्रश्न बाजूला ठेवून लव्ह जिहाद, घरवापसी असे विविध मुद्दे उपस्थित करत देशात वाद निर्माण केला जात आहे. दुसरीकडे विचारवंतांच्या हत्या होत आहेत. मध्यंतरी औरंगाबादमध्ये जे घडले त्यात तर पोलीसच दंगल करत होते, असे व्हिडिओसमोर आले, हे असे कधी आपल्या महाराष्ट्रात, देशात घडले नव्हते, अशी खंत फौजिया खान यांनी व्यक्त केली. सर्व सरकारी संस्थांवर ताबा घेतला जात आहे. उन्नाव, कथुवासारख्या घटना समोर येत आहेत. अनेक लोकप्रतिनिधींवरच बलात्काराच्या केसेस आहेत. न्याय मागायचा तर कुणाकडे, असा प्रश्न सामान्य जनतेसमोर उभा राहिला आहे, असेही फौजिया खान म्हणाल्या. देशातील एकही घटक आज समाधानी नाही. सर्वच लोक रस्त्यावर उतरत आहेत म्हणून हे अभियान हाती घेतले असल्याचे फौजिया खान यांनी सांगितले. युरोपमध्ये महिलांनी क्रांती केली होती. आता भारतातही महिलांनी क्रांती करणे गरजेचे आहे. हा दुसरा स्वातंत्र्यसंग्राम आहे. त्यामुळेच महिलांनी पुढाकार घेतला आहे. महिलांवरील अत्याचारात वाढ झाली आहे. महिलांना पुढे यावे लागत आहे यावरूनच परिस्थिती किती गंभीर आहे ते समजते. कुटुंब संकटात असेल तर घरातील महिलेलाच ते सावरावे लागते. आपला देश एक कुटुंबच आहे, त्यामुळे त्याला संकटातून वाचवण्यासाठी आम्ही महिला पुढे आलो आहोत, अशी माहितीही त्यांनी दिली.
पक्षाचे सर्व नेते उतरणार अभियानात
राज्याच्या विविध भागांत हे संविधान वाचवा अभियान घेतले जाणार आहे. 20 जून रोजी संविधान बचाव कार्यक्रमाला खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रीय सरचिटणीस टी. पी. पितांबरन मास्टर, राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार प्रफुल्ल पटेल, विधीमंडळ पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादीचे नेते आमदार छगन भुजबळ, विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, खासदार माजिद मेमन, राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, आमदार जितेंद्र आव्हाड, मुंबई अध्यक्ष सचिन अहीर आदींसह प्रमुख नेते, खासदार, आमदार व पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत अशी माहितीही त्यांनी दिली. या पत्रकार परिषदेला आमदार विद्या चव्हाण, मुंबई महिला अध्यक्षा सुरेखा पेडणेकर, माजी महिला प्रदेशाध्यक्षा सुरेखा ठाकरे, महिला आयोगाच्या माजी सदस्या आशा मिरगे, आशा भिसे आदींसह इतर कार्यकर्त्या उपस्थित होत्या.