मुंबई । भारतीय जनता पार्टीच्यावतीने ‘बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ अभियान व रिफाय यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय संयोजक डॉ राजेंद्र फडके यांच्या मार्गदर्शनाखाली भारतरत्न लता मंगेशकर यांना समर्पित मैफिल होणार आहे. भारतरत्न लता मंगेशकर ह्या केवळ भारतच नव्हे तर जगभरातील महिलांसाठी प्रेरणा आहेत. गानसम्राज्ञी लतादीदी यांच्या नुकत्याच पार पडलेल्या 88 व्या वाढदिवसाचे औचित्य साधत देशात वेगवेगळ्या ठिकाणी आणि परदेशात एका ठिकाणी अशा एकूण 88 सांगितीक कार्यक्रमांची मैफल आयोजित केली जाणार आहे. रिफाय आर्टिसंस अॅण्ड प्राजेक्ट्स तर्फे ‘हर मैजेस्टी’ या उपक्रमांतर्गत या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ठाण्यातील विश्वास सामाजिक संस्थेच्यावतीने भारतरत्न लता मंगेशकर यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष मैफिलीचे आयोजन ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे रविवारी, 4 नोव्हेंबरला सांयकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास केल्याची माहिती आयोजक संजय वाघुले यांनी यावेळी दिली.
100 हून अधिक वादकांचा भव्य ऑर्कस्ट्रा
मुंबईत होणार्या कार्यक्रमात नामवंत गायक-गायिकांप्रमाणे 100 हून अधिक वादकांचा भव्य ऑर्कस्ट्रा असणार आहे. संगीत नियोजन आणि दिग्दर्शक प्रकाश पीटर्स या मैफिलींचे संयोजन करणार आहेत. त्यात, लता मंगेशकर यांच्याविषयी ठाऊक नसणार्या काही गोष्टींचाही परिचय करून दिला जाणार आहे. हिंदी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ मानले जाणारे संगीत श्रोत्यांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. लता मंगेशकर यांच्या प्रत्येक संगीत दिग्दर्शकाबरोबरच्या सांगितिक प्रवासाची माहिती सूत्रसंचालक, गायक-गायिका देणार आहेत. भारतरत्न लता मंगेशकर संगीत क्षेत्रात 75 वर्षांहून आधिक शिखारावर विराजमान आहेत, ही गोष्ट भारतसाठी नव्हे तर संपूर्ण जगासठी एकमेव द्वितीय अशी अभिमानास्पद गोष्ट आहे. संपूर्ण देश या लिव्हिंग लेजेंडचा सन्मान करित आहे. ही जगातील पहिलीच ऐतिहासिक घटना आहे.
मान्यवरांच्या कार्यक्रमास शुभेच्छा
भारतीय जनता पार्टी ‘बेटी बचाओ बेटी पढ़ाओ अभियान व रिफाय यांच्या संयुक्त विद्यमाने भारत देश ह्या भारत कन्येचा म्हणजेच लिविंग लेजेंडचा गौरव करत आहे, हे जगातील पहिलच उदाहरण आहे. कार्यक्रमास पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, महाराष्ट्र भाजपा प्रदेश अध्यक्ष, खासदार रावसाहेब दानवे पाटील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महिला बाल विकास मंत्री पंकजा मुंडे, बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाचे पालक खासदार डॉ.विनय सहस्त्रबुद्धे, राष्ट्रीय संयोजक डॉ.राजेंद्र फडके यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या आहेत.
पाच कर्तुत्ववान महिलांचा गौरव
सांगितिक कार्यक्रमांची सुरूवात 5 नोव्हेंबर रोजी ठाणे, पनवेल येथे मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. पुढ़ील दोन महिन्यांत देशातील अन्य भागात हे 88 कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. या मालिकेतील शेवटचा भव्य कार्यक्रम जानेवारीमध्ये मुंबईत होणार आहे. त्या कार्यक्रमात सिनमा, संगीत, राजकीय तसेच अन्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित असतील. देशभरामधील 88 ठिकाणी होणार्या कार्यक्रमामध्ये प्रत्येक भागातील पाच कर्तुत्ववान महिलांना गौरवण्यात येणार आहे.
राज्यात 40 ठिकाणी होणार कार्यक्रम
महाराष्ट्र राज्यात हा कार्यक्रम 40 ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियानचे राष्ट्रीय संयोजक डॉ राजेंद्र फडके यांच्या नेतृत्वाखाली, प्रदेश संयोजक शामभाऊ सातपुते, सहसंयोजक अर्चना डेहणकर, डॉ.अस्मिता पाटील, प्रसिद्धीप्रमुख डॉ. राजू रामव राज्य टीम तसेच जिल्हा टीमच्या सहयोगाने राबविला जाणार आहे, देशभरात रिफायचे प्रमुख राजेश कुलकर्णी हे कार्यक्रम राबविणार आहेत. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अखिल भारतीय नाट्य परिषद पनवेल शाखेच्यावतीने रविवार 5 नोव्हेंबर रोजी सायंकाळी ‘हर मैजेस्टी’ ‘ए ट्रिब्युट भारतरत्न लता मंगेशकर’ या सुमधुर गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात होणार आहे. ही मैफील सायंकाळी 7 वाजता होणार असल्याची माहिती भाजपा आमदार प्रशांत ठाकूर तसेच भाजपाचे नगरसेवक परेश ठाकूर यांनी यावेळी दिली.