देशाबद्दल माहिती घेवूनच दीपिकाने निर्णय घ्यावे: रामदेव बाबा

0

इंदूर : सिने अभिनेत्री दीपिका पदुकोणने अगोदर भारत देशाबद्दल सविस्तर माहिती घ्यावी, नंतर योग्य ते निर्णय घ्यावे असा सल्ला योगगुरू रामदेव बाबा यांनी दिला आहे. तसेच दीपिका पदुकोणने सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक मुद्द्यांचे योग्य आकलन करून घेण्यासाठी माझ्यासारखा सल्लागार नियुक्त केला पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थ्यांना दीपिका पदुकोणने पाठिंबा दिल्यानंतर सुरू झालेल्या वादानंतर रामदेव बाबा यांनी हे विधान केले आहे.

दरम्यान, जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर देशभरात ठिकठिकाणी निदर्शने झाली. याचदरम्यान अभिनेत्री दीपिका पादुकोण जेएनयूमध्ये आंदोलक विद्यार्थ्यांच्या भेटीसाठी पोहोचली आणि सगळीकडे खळबळ माजली. दीपिका पदुकोणने जेएनयूमध्ये जाऊन आंदोलक विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला होता. यावेळी तिने कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. विद्यार्थ्यांच्या आंदोलनात ती केवळ दहा मिनिटे उपस्थित होती. त्यावरून भाजपाने दीपिकावर टीका केली होती. तसेच, अनेकांनी तिच्या ‘छपाक’ या सिनेमावर बहिष्कार टाकण्याची भाषा केली होती.

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला समर्थन करत रामदेव बाबा म्हणाले, “ज्या लोकांना सीएएचा फुलफॉर्मही माहीत नाही, ते लोक या विषयावर पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत अपशब्दांचा वापर करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आधीच स्पष्ट केले आहे की, हा कायदा कोणत्याही व्यक्तीचे नागरिकत्व काढून घेण्यासाठी तयार करण्यात आला नसून नागरिकत्व देण्यासाठी हा कायदा तयार करण्यात आला आहे. तरीही काही लोक आगी लावण्याचे काम करत आहेत, अशी टीका रामदेव बाबांनी विरोधकांवर केली आहे.