लोणावळा। देशाला प्रगतीच्या वाटेवर घेऊन जाण्याचे सामर्थ्य शिक्षणात असल्याने विद्यार्थी मित्रांनो खूप शिका व शिक्षणाचा चांगला उपयोग करा असा सल्ला प्रसिध्द सिनेअभिनेत्री व माजी राज्यसभा खासदार शबाना आझमी यांनी दिला. लोणावळा नगरपरिषदेच्या शिक्षण, क्रिडा व सांस्कृतिक कार्य समिती तसेच महिला व बालकल्याण समिती यांच्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थी व मुख्याध्यापक पुरस्कार सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रसिध्द सिनेअभिनेत्री शबाना आझमी बोलत होत्या. यावेळी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, शिक्षण, क्रिडा व सांस्कृतीक कार्य समिती सभापती अर्पणा बुटाला, महिला व बालकल्याण समिती सभापती रचना सिनकर, उपसभापती जयश्री आहेर यांच्यासह नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थी व शाळांच्या मुख्यध्यापकांचा सत्कार करण्यात आला.
विचारांना श्रीमंती
यावेळी बोलताना शबाना आझमी म्हणाल्या मुलांनो शिक्षणाचा उपयोग आपण कसे करता यावर तुमचे भविष्य आधारित आहे. शिक्षणांमुळे तुमच्या विचारांना श्रीमंती मिळत असते. अध्यक्षीय भाषणात बोलताना नगराध्यक्षा सुरेखा जाधव म्हणाल्या बक्षिसांमुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळत असते याकरिता नगरपरिषदेच्या वतीने मुलांना सव्वालाख रुपयांची रोख बक्षिसे वितरित करण्यात आली आहेत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्पणा बुटाला यांनी केले तर प्रतिभा दरेकर व चित्रा जोशी यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. रचना सिनकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.