भुसावळ । वार्षिक स्नेह संमेलनादरम्यान मागील दोन दिवसापासून मराठी भाषा दिवस व राष्ट्रीय विज्ञान दिवस मोठ्या उत्साहात गाडगेबाबा अभियांत्रिकीत साजरा केला जात आहे. सुरुवातीला इलेक्ट्रॉनिक्स अँन्ड टेलीकम्यूनिकेशन विभागाच्या सूचित पाटील या विद्यार्थ्यांने विज्ञान दिवसाबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली. विवेकाने वापरलेले ज्ञान म्हणजे विज्ञान अशी विनोबांनी विज्ञानाची साधी सोपी, व्याख्या केली आहे. डॉ. होमी भाभा, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम, डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. जयंत नारळीकर यांच्यासारख्या अनेक वैज्ञानिकांनी भारताला वैज्ञानिक क्षेत्रात एक प्रतिष्ठा मिळवून दिली आहे. त्याच्या कार्याचे महाविद्यालयाच्या प्रांगणात कौतुक केले गेले.
विज्ञान ही एक जगण्याची दृष्टी
आजचे युग हे विज्ञान तंत्रज्ञानाचे युग आहे, असे आपल्याला नेहमीच ऐकायला मिळते आणि अगदी ते खरेही आहे. आधुनिक उपकरणे, सुखसाधने, वाहने माणसाच्या दिमतीला तयार आहेत. संशोधक मंगळ, शुक्राच्या गोष्टीच करीत नाहीत, तर चंद्र आणि मंगळावर जाऊनही पोहोचले आहेत.
शिक्षकांचे मनोगत
अणुऊर्जा कार्यक्रम, अवकाश संशोधन, कृषिविज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स, दुरसंचार तंत्रज्ञान, संरक्षण, औद्योगिक उत्पादन अशा अनेक क्षेत्रांत आज आपण लक्षणीय कामगिरी केली आहे. गेल्या काही दशकांमध्ये भारतीयांनी वेगवेगळ्या क्षेत्रांत मुसंडी मारली आहे आणि संपूर्ण जगाला त्याची दखल घ्यावी लागलेली आहे. आपण अजूनही विकसित राष्ट्रांच्या तुलनेत मागे आहोत ही कटू वस्तुस्थिती आहे असे प्रा. धिरज पाटील यांनी माहिती दिली.