बुलढाणा: येणाऱ्या वर्षात देशावर आर्थिक संकट कोसळण्याची भिती बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळ घट मांडणीत करण्यात आली आहे. तसेच लोकसभेच्या निवडणुकीनंतर देशात स्थिर सरकार स्थापन होईल असेही भाकीत वर्तवण्यात आले आहे. बुलढाणा जिल्ह्यात भेंडवळ या गावी दर वर्षी अक्षय तृतीयेच्या दिवशी घट मांडण्यात येते. या गावात साडेतीनशे वर्षाची परंपरा असून याकडे पूर्ण राज्याचे लक्ष लागून असते.
या वर्षी राज्यात पाऊस समाधानकारक राहील, तसेच नेसर्गिक संकट कोसळण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. तसेच देशाची सुरक्षा उत्तम प्रकारे राहील, देशात घुसखोरी वाढणार असून भारतीय सुरक्षा रक्षक चोख उत्तर देईल असही या भविष्यवाणीत सांगण्यात आल आहे.
भेंडवळच्या भविष्यवाणीतून राजकीय भाकित व्यक्त करण्यात आले. घटमांडणीत सत्तेचे प्रतीक असलेले पान आणि विडा कायम आहे. पान स्थिर आहे. त्यावरील नाणेही कायम आहे. सुपारी किंचित हललेली आहे. पण सत्ता स्थिर राहणार असल्याचे भविष्यवाणीतून सांगण्यात आले. करंजी हललेली असून, देशाला आर्थिक संकटांना सामोरे जावे लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.