पुणे : 1854 साली लॉर्ड डलहौसी यांनी नदी जोड प्रकल्प योजना अंमलात आणण्याचा प्रयत्न केला होता. त्याकाळी हा प्रकल्प झाला असता तर भारताला स्वातंत्र्य ही लवकर मिळाले असते. भारत देश जर महासत्ता व्हायचा असेल तर नदीजोड प्रकल्प महत्वाचा आहे, असे मत त्रिपुराचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांनी व्यक्त केले.
पुणे महानगरपालिकेच्या वतीने माजी गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्या हस्ते डॉ. डी. वाय. पाटील यांचा विशेष मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. शाल, श्रीफळ, मानपत्र आणि पुणेरी पगडी देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
जगातील प्रगतीकडे आपण पाहायला हवे, भारताची तुलना ही जगातील चांगल्या देशाशी व्हायला पाहिजे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळक आणि आगरकर यांच्यात शिक्षण अगोदर की स्वातंत्र्य यावर वादविवाद व्हायचा.
बहुजनांना समाजाला शिक्षित केले
डी. वाय. पाटील यांनी आगरकरांचा मार्ग स्विकारला आणि शिक्षणाच्या क्षेत्रात बहुजनांना समाजाला शिक्षित करण्याचे काम केले, असे शिंदे यांनी सांगितले. मंत्री नसतानाही त्यांना लाल दिव्यांची गाडी शासनातर्फे देण्यात आली होती. ही खूप मोठी कर्तृत्वाची गोष्ट असल्याचे त्यांनी पुढे सांगितले. पुण्याचे महापौर प्रशांत जगताप, उपमाहापौर मुकारी अण्णा अलगुडे, अरविंद शिंदे, माजी महापौर दत्तात्रय धनकवडे, माजी आमदार मोहन जोशी, माजी आमदार कुमार सप्तर्षी, सतेज पाटील, संजय पाटील, पी. डी पाटील. आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
शिक्षण महर्षी म्हणून मिरवण्यापेक्षा महाराष्ट्रातील मुलांना शिक्षण मिळवून देण्यासाठी काही लोकांनी प्रयत्न केले. परंतु अशा लोकांना अडचणीत आणण्याचे काम सरकारी यंत्रणा करत आहे. महाराष्ट्रातील पुरोगामी व धर्मनिरपेक्ष विचार मारण्याचा प्रयत्न या सरकारकडून होतोय.
– प्रशांत जगताप, महापौर