भडगाव । ग्रामीण भागातील तरुणांची बौद्धीक व शारीरिक क्षमता अफाट आहे. त्यांनी देशाच्या रक्षणासाठी सैन्यदल, नौदल व वायुसेनेत भरती व्हावे, असे आवाहन भारतीय नौदलाचे व्हाईस अॅडमिरल सुनील भोकरे यांनी गुढे येथे झालेल्या नागरी सत्काराप्रसंगी सांगितले. भारतीय नौदलाच्या व्हाईस अॅडमिरल पदी सुनील भोकरे यांची नियुक्ती झाल्यानंतर ते पहिल्यांदा जन्मगाव गुढे येथे आले. मंगळवारी सकाळी 9 वाजता ते गावाच्या वेशीजवळ दाखल झाल्यानंतर या ठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी काढलेल्या मिरवणुकीत लेझीम पथकातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. स्वागत मिरवणुकी दरम्यान गावातील महिलांकडून सुनील भोकरे यांचे ठिकठिकाणी औक्षण करण्यात येत होते. सुरुवातीला आपल्या नातेवाईकांच्या घरी भेट दिल्यानंतर ते शिवाजी चौकातील सत्कार समारंभस्थळी दाखल झाले. या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, आमदार किशोर पाटील, नागरी सत्कार समितीचे अध्यक्ष कृष्णराव पाटील, जि.प.सदस्य विकास पाटील, वडिल वसंतराव भोकरे, आई इंदूताई भोकरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
नागरी सत्कार समितीचे पदाधिकारी व मान्यवरांच्या हस्ते व्हाईस अॅडमिरल सुनील भोकरे गौरव करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना भोकरे यांनी सांगितले की, लहानपणी गावात असताना काकासोबत पाटावर पोहण्यासाठी जात होतो. नौदलात काम करतांना त्याचा लाभ झाला, असे सांगितले.