मोखाडा । देशाच्या विकासात्मक प्रक्रियेला गतिमान करण्यासाठी भ्रष्टाचारमुक्त भारत घडवू या, असे प्रतिपादन मोखाडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश सोनवणे यांनी केले. ते मोखाडा येथील रयत शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयात आयोजित केलेल्या कार्यशाळेत बोलत होते. भ्रष्टाचाराविरूध्द लढा देताना जर तुमचा आवाज दाबू पाहत असेल, तर पोलीस तुमच्या पाठीशी आहे, असेही सोनवणे म्हणाले. कार्यक्रमाचे आयोजन पालघर पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे व ठाणे पोलीस अधीक्षक संग्राम निशाणदार यांनी केले होते. शासन आणि जनता यातील अंतर कमी करून शासनाला लोकाभिमुख करण्याची गरज आहे.
पैशाची मागणी केल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करा
आज कोणत्याही कामासाठी पैसे मागितले जातात. जर जातीचा दाखला, उत्पन्न दाखला या स्वरूपाच्या कामासाठी कोणी पैशाची मागणी करीत असेल तर त्यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे १०६४ या क्रमांकावर तक्रार करू शकतो. फोन करणार्या व्यक्तीचे नाव गुप्त ठेवले जाईल. पैशाव्यतिरिक्त वस्तूच्या स्वरूपात मागणी करीत असेल, तर त्याचीही तक्रार या विभागाकडे करता येते, असे प्रतिपादन भोसले यांनी केले. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. व्ही. एम. डोंगरदिवे यांनी केले, तर आभार व हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्रा. बी. एन. माळोदे यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमास शांतता कमिटीचे सदस्य, व्यापारी संघटनेचे सदस्य, ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने मोठ्या संख्येने उपस्थित होते.