पुणे । सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. अनेकजण वेगवेगळ्या प्रकारे बाप्पाप्रती असलेली आपली भक्ती व्यक्त करताना दिसत आहे. असेच एक गणेशभक्त विकास बिसने यांनी अनेक दिवसांपासून संग्रह केलेल्या गणेश मूर्तींचे प्रदर्शन भरवले आहे. हे प्रदर्शन घोले रोडवरील राजा रविवर्मा कला दालनात 3 सप्टेंबरपर्यंत दुपारी 12 ते रात्री 10 या वेळेत निशुल्क पाहता येणार आहे.
या प्रदर्शनात देश, विदेशातील गणपती बाप्पांच्या तब्बल 1500 मूर्ती ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये स्पायडर मॅन, क्रिकेट खेळणारा गणपती, सुपारी पासून तयार केलेला, नारळाच्या करवंटी पासून तयार केलेला, वेगवेगळ्या धातूंपासून, काच, प्लास्टिक, तांदळाच्या दाण्यावर, पेन्सिलच्या टोकावर, लाकूड, चंदन, हस्तिदंत, मार्बल, साबण यांच्यापासून तयार केलेल्या गणेश मूर्ती या प्रदर्शनात आहेत. बिसने हे माईन इंजिनियर असून त्यांनी 1996 पासून गणेशमूर्तीचा संग्रह करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी नेपाळच्या मॉलमध्ये बाप्पांच्या विभिन्न मूर्ती पहिल्या होत्या. तेव्हापासून त्यांना मूर्तींचा संग्रह करण्याचा छंद लागला.