देश संकटात असताना राजकारण नको – शरद पवार

0

मुंबई – देशावर करोनाचे संकट आले आहे. करोनाशी लढताना कोणीही राजकारण करू नये. देशात कुणाचे सरकार आहे आणि राज्यात कुणाचे सरकार आहे, याचा विचारही मनात आणता कामा नये. करोनाचा पराभव हाच आपला एककलमी कार्यक्रम असायला हवा, असे आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे.
शरद पवार यांनी आज राज्यातील जनतेशी फेसबुकद्वारे पुन्हा संवाद साधला. यावेळी त्यांनी वांद्रे येथील घटनेवरही भाष्य करत हा प्रसंग दुर्देवी होता. याची राज्यात कुठेही पुनरावृत्ती घडता कामा नये. यावरुन राजकारण करणार्‍यांनाही त्यांनी सबुरीचा सल्‍ला दिला. राजकीय संघर्ष आपण नेहमी करत असतो. त्यात काही चुकीचे नाही. लोकशाहीत असा संघर्ष होतच असतो. पण सध्या देशात संकट असताना राजकारण करणे योग्य नाही, असे पवार म्हणाले.

आर्थिक संकट गंभीर

करोना आणि लॉकडाउनचे आर्थिक परिणाम दिसून येत आहेत. अर्थकारणावर फार मोठा परिणाम होताना दिसत आहेत. उत्पादनाची साखळी ठप्प झाली आहे. त्यामुळे उद्योग आणि इतर क्षेत्रही आर्थिक अडचणीत आली आहेत. त्यामुळे येणार्‍या काळात याचे विपरित परिणाम जाणवणार आहे. बेकारी आणि बेरोजगारी वाढणार आहे. हे संकट मोठे आहे. त्यासाठी आतापासून उपाययोजना करण्याची गरज आहे. उद्योजकांना पैसा उपलब्ध करुन दिला पाहिजे. अर्थव्यवस्थेसाठी विशेष प्रयत्न गरजेचे आहेत. करोनाचे परिणाम वर्षभर जाणवू शकतात असे शरद पवार म्हणाले.