पंतप्रधानांनी चढविला अपप्रवृत्तींवर हल्ला
नवी दिल्ली : देशातील अनेक लोक रस्त्यावर थुंकतात, रस्त्यावर कचरा फेकतात. भारतमातेची अशाप्रकारे अवहेलना करणार्या या लोकांनी त्यांना खरेच वंदे मातरम् म्हणायचा हक्क उरला आहे का, याचा विचार केला पाहिजे. या देशात वंदे मातरम् बोलायचा हक्क सर्वप्रथम कोणाला असेल तर तो सफाई कामगारांना आहे. देश स्वच्छ ठेवणारे हेच लोक भारतमातेचे खरे सुपुत्र आहेत. माझ्या मते भारतात पहिले शौचालय, मग देवालय, हा विचार रुजायला पाहिजे, असेही असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. स्वामी विवेकानंद यांच्या शिकागोतील भाषणाला 125 वर्षपूर्तीनिमित्त दिल्लीत स्टुडंट लीडर्स कन्वेंशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मोदी बोलत होते.
असहिष्णूतेवर भाष्य
विरोधकांकडून सातत्याने होणार्या असहिष्णूतेच्या वातावरणाच्या टीकेवरून नरेंद्र मोदी यांनी भाषणात स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा दाखला देत भाष्य केले. मोदी म्हणाले, भारतात ब्रिटीशांचे राज्य असतानाही स्वामी विवेकानंद यांच्या वागण्याबोलण्यात कुठेही गुलामीची छाया जाणवत नव्हती. आपल्या चारी बाजूंना नकारात्मक वातावरण असेल, तुमचा आवाज दाबला जात असेल, तर अनेकांना बोलायला भीती वाटते. मात्र, स्वामी विवेकानंद यांनी अशा कोणत्याही भीतीला जुमानले नाही. देश गुलामीत असूनही त्यांच्या अंतर्मनात आत्मविश्वासाची आग धगधगत होती. ही गोष्ट असामान्य अशीच होती.
विवेकानंदांनी अनिष्ट प्रथांवर कोरडे ओढले
स्वामी विवेकानंद यांच्याबाबत बोलताना मोदी म्हणाले, स्वामी विवेकानंद यांनी आपल्या भाषणांतून जगाला भारताची नवी ओळख करून दिली. मात्र, धर्माचा आणि परंपरांचा पगडा असलेल्या देशातून पुढे आलेल्या स्वामी विवेकानंदांनी प्रसंगी समाजातील अनिष्ट प्रथांवर कोरडे ओढायलाही कमी केले नाही. स्वामी विवेकानंदांनी आपल्या जीवनात गुरू शोधण्याऐवजी सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. ते केवळ उपदेश देऊनच थांबले नाहीत. तर त्यांनी आपल्या कल्पनांना आदर्शवादामध्ये परावर्तित केले. या सगळ्या विचारांना त्यांनी संस्थात्मक रुपही दिले.
…तर अमेरिकेत 9/11 घडले नसते
विद्यार्थ्यांना संबेधित करताना पंतप्रधान म्हणाले, 125 वर्षांपूर्वी याच दिवशी स्वामी विवेकानंद यांनी शिकागोत ते ऐतिहासिक भाषण केले होते. तेथे जमलेल्या सर्व मान्यवर वक्त्यांनी आपल्या भाषणाची सुरूवात लेडीज अॅण्ड जंटलमन्स अशी केली. मात्र, स्वामी विवेकानंदांनी ब्रदर्स अण्ड सिस्टर्स अशी सुरुवात करत उपस्थितांची मने जिंकली. या अवघ्या दोन शब्दांमध्ये त्यांनी जगाला भारतीय संस्कृतीचा परिचय करुन दिला. सव्वाशेवर्षांपूर्वी घडलेल्या या 9/11 चा विसर जगाला पडला नसता तर 2001 मध्ये अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील 9/11 चा हल्ला घडलाच नसता, असे मोदी म्हणाले.