देहु ग्रामस्थांनी केली मागणी
देहुरोड : आळंदीतील यात्रेनंतर आता नवीन वर्षामध्ये तीर्थक्षेत्र देहूगावामध्ये तुकाराम बीज सोहळा होणार आहे. यासाठी संपूर्ण राज्यातून लाखो भाविक येत असतात. तसे तर तीर्थक्षेत्र देहू येथे वर्षभर भाविकांची वर्दळ सुरू असते. आषाढी वारी आणि संत तुकाराम बीज सोहळ्याला मोठ्या प्रमाणात भाविक आपली उपस्थिती लावत असतात. भाविकांना व स्थानिकांना कोणताही त्रास होऊ नये, याची काळजी घेणे ही प्रशासनाची जबाबदारी असते. नागरिकांना सुविधा मिळाव्यात यासाठी विकासकामे केली जातात. परंतु हीच विकासकामे आता डोकेदुखी ठरत असून अवघ्या दोन महिन्यांवर आलेल्या बीज सोहळ्यापूर्वी पूर्ण न झाल्यास मोठ्या समस्या निर्माण होऊ शकतील. त्यामुळे बीज सोहळ्यापूर्वी ही कामे पूर्ण करावीत, अशी मागणी देहू ग्रामस्थ करीत आहेत.
हे देखील वाचा
गावामध्ये रात्रीच्या वेळी अंधार
संपूर्ण देहु परिसरात रस्ते, पाणी, स्वच्छता, दिवे अशा सर्व प्रकारच्या समस्यांचे डोंगर उभे राहिले आहेत. देहुच्या बाहेरून तयार करण्यात आलेल्या रिंग रोडवर पथदिवे नसल्याने येथे रात्रीच्या वेळी अंधार असतो. वडाचा माळ ते येलवाडी दरम्यान शेतकर्यांनी अडविण्यात आलेले रस्ता आदी कामे पूर्ण झालेली नाहीत. तसेच देहू आळंदी रस्ता व देहू- देहू रोड रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. वारंवार तात्पुरती डागडुजी करून खड्डे बुजवण्यात लाखो रुपये खर्च करण्यात येत आहेत. पैसा तर खर्च होतो परंतु रस्ता नीट होत नाही. या रस्त्याचे आहे तेवढे तरी किमान नवीन डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी स्थानिक करत आहेत. तीर्थक्षेत्र देहुमध्ये आल्यास सर्वत्र खोदकाम, खड्ड्यात साचलेले पाणी, राडा-रोड्याचे ढीग, सर्वत्र अस्वच्छता असे दृश्य दिसत आहे. तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत तीर्थक्षेत्र देहू परिसरात विविध विकास कामे झाली असून काही कामे सुरू आहेत. देहू-आळंदी मार्गावर भूमिगत गटाराचे (ड्रेनेज) कामे चालू आहे. या परिसरात सुरू असलेल्या कामाने रस्त्याच्या कडेला टाकण्यात आलेले राडारोडा, मातीच्या ढिगार्याने गटारी नाले तुंबल्या आहेत.