देहूरोड : संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा अवघ्या दिवसांवर येऊन ठेपला आहे, तरीही या पालखी मार्गातील अनेक कामे झालेली नसल्याचे दिसून येत आहे. देहू गावातील पालखी मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडलेले दिसून येत आहेत. सोहळ्यासाठी संस्थान, वारकरी आणि शासनाचे विविध विभाग तयारीला लागले आहेत. काही पातळ्यांवर तयारी पूर्ण झाली असून, काही बाबतीत मात्र तयारी पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. यावर्षी तयारी व नियोजनाच्या बैठकांनी उच्चांक गाठला आहे. या बैठकांना हजेरी लावता-लावता सोहळाप्रमुखांची दमछाक झाली. वेळोवेळी झालेल्या बैठकांमध्ये सर्वात कळीचा मुद्दा ठरलेला रस्त्यांच्या डागडुजीचा प्रश्न मात्र अजूनही प्रलंबित आहे. अवघ्या आठवड्यावर आलेल्या या सोहळ्याचा मार्ग खड्डेमय रस्त्यांमुळे खडतर ठरणार आहे.