देहूरोड- मराठा आरक्षणासाठी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला देहु परिसरात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. गावातील सर्व दुकाने आणि दैनंदिन व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. सकाळी अकराच्या सुमारास सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची ग्रामपंचायत चौकात श्रध्दांजली सभा झाली.
देहुगावात बंदला प्रतिसाद म्हणून सर्व व्यवहार आज उत्स्फुर्तपणे बंद ठेवण्यात आले होते. भाजीपाला विक्रीची दुकाने देखील बंद ठेवण्यात आली होती. मात्र, औषधांच्या दुकाने आणि रुग्णालयांना या बंदमधुन सुट देण्यात आली होती.
गावातील शाळाही सुरळीत सुरू होत्या. सकाळी अकराच्या सुमारास गावातील ग्रामपंचायत समोरील चौकात सर्वपक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची सभा आयोजित करण्यात आली होती. आरक्षणाच्या मागणीसाठी गोदावरी नदीत जलसमाधी घेतलेल्या काकासाहेब शिंदे यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. विशेष म्हणजे या सभेला भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्तेही उपस्थित होते. शासनाच्या धोरणाचा यावेळी निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी रमेश हगवणे, सुनिल हगवणे, मधुकर कंद, अभिमन्यु काळोखे, शांताराम हगवणे, संजय मोरे, बाळासाहेब काळोखे, माणिक जाधव, विठ्ठल काळोखे, तुकाराम काळोखे, शंकर काळोखे, उमेश मोरे, दत्तात्रय नांगर, संतोष शिंदे, सोमनाथ चव्हाण, अभिजीत कंद आदी प्रमुख पदाधिकार्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.