माळवाडी परिसरामध्ये रस्त्याच्या मधोमध बनविले चेंबर; उंची बनविली जास्त
यामुळे रात्रीच्या वेळी दुर्घटना घडण्याची शक्यता
देहुरोड : देहुरोड परिसरातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झालेली दिसून येत असून या रस्त्यांवरून वाहन चालविणे मोठे कठीण झाले आहे. या परिसरातील माळवाडी-बोडकेवाडी रस्त्यावर मध्येच मैलापाण्याचे चेंबर बनविले आहे. हे चेंबर सुमारे रस्त्याच्या उंचीपासून साधारण एक फूट उंच आहेत. रस्त्यावरील खोदलेले खड्डे न भरल्याने हे चेंबर धोकादायक झाले आहेत. दिवसा हे चेंबर दुरून समजून येत नाहीत, मग रात्री कसे समजणार? त्यामुळे जर वाहनचालक त्या चेंबरला येऊन धडकला तर मोठी दुर्घटना घडू शकते. रात्रीच्या वेळी दुर्घटना घडून जिवीत हानी होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने नविन रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्याची मावळ तालुका महिला उपाध्यक्षा वैशाली टिळेकर यांनी केली आहे.
दिरंगाईमुळे नागरिक नाराज
हे देखील वाचा
माळीनगर येथील रस्त्यावर मल:निस्सारण वाहिन्या टाकण्याचे काम नुकतेच पूर्ण करण्यात आले आहे. या कामात प्रशासकीय अधिकारी व संबंधित ठेकेदार यामध्ये संवाद होत नाही. त्यामुळे या रस्त्याच्या कामाला सुरवात करण्यात आली नसल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबत ठेकेदारांनी सांगितले की, दोन दिवसात रस्त्याच्या कामाला सुरवात केली जाणार आहे. मात्र आठवडा उलटून गेले तरी या रस्त्याच्या कामाला सुरवात करण्यात आलेली नाही. त्यामुळे येथील रहिवाशांना आपली वाहने गावाच्या बाहेर रस्त्याच्या कडेला वाहने उभी करावी लागतात. परिणामी वाहतुकीला अडथळा निर्माण होवून वाहतूक कोंडी होत आहे. रस्त्यांवर उभ्या वाहनांनी नागरीकांमध्ये वादाचे प्रसंग घडत आहे. विविध शासकीय विभागांमधील अधिकारी यांच्याशी साधलेल्या संर्पकातुन विकास कामामध्ये विविध अधिकार्याच्या आपआपसातील समन्वयाचा अभाव असल्याचे स्पष्ट होत आहे. विकास कामातील होणार्या दिरंगाईने ग्रामस्थांना होणारा नाहक त्रास कधी संपणार असा प्रश्न निर्माण होत आहे. या रस्त्यावरील धोकादायक बनलेले ड्रेनेज चेंबरमुळे मोठा अपघात घडून जिवीत हानी झाल्यानंतर रस्त्याच्या कामाला सुरवात करणार का, असा संतप्त सवालही त्यांनी उपस्थित केला.
बांधकाम विभागाला सूचना
याबाबत प्रशासकीय अधिकारी धनंजय जगधने यांनी सांगितले की, या रस्त्यावर नव्याने रस्त्याची उंची वाढविण्यात येणार आहे. चेंबरची उंची वाढविणे आवश्यक होते ती वाढविली आहे. या नंतर रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करण्याबाबत सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाने देणे आवश्यक आहेत. संबधीत ठेकेदाराने चेंबरसाठी खोदण्यात आलेले खड्डे बुजविल्यानंतर व त्याचे खडीकरण डांबरीकरण केल्यानंतर रस्त्यावरील थर टाकण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे.