पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष संवर्धन गरजेचे!
सदर्न कमांड प्रधान संचालक पेंगु यांनी केले प्रतिपादन
देहुरोड : गेल्या अनेकवर्षांपासून वृक्षतोड सुरू आहे. विकासासाठी, रस्त्यांसाठी विविध कारणांसाठी ही वृक्षतोड केली गेली. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळू लागला आहे. पर्यावरणाच्या बिघडलेल्या समतोलामुळे अनियमित व अपूर्ण पर्जन्यमान, वाढत्या संकटांना तोंड देणे भाग पडत असून, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण व संवर्धन करणे आवश्यक आहे, असे मत सदर्न कमांड रक्षा संपदा विभागाचे प्रधान संचालक एल.पेगू यांनी व्यक्त केले. देहुरोड कॅन्टोमेंट बोर्डाच्यावतीने थॉमस कॉलनी व बाह्यवळण महामार्ग अर्थात वॉर्ड क्र.1मध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले. याप्रसंगी पेंगु यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्यावेळी त्यांनी विचार व्यक्त केले. कार्यक्रमाला बोर्ड अध्यक्ष ब्रिगेडियर ओ.पी.वैष्णव, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित सानप, नगरसेवक रघूवीर शेलार, लायन्स क्लबचे अध्यक्ष अवतारसिंग कांद्रा, मावळ प्रबोधिनीचे अध्यक्ष रवींद्र भेगडे, भाजपाचे माजी शहराध्यक्ष उद्धव शेलार, नरेंद्र महाजनी, मनोज वाखारे, विलास शिंदे, दिलीप शेलार, राजेश मुर्हे, राजेश मांढरे आदी तसेच कॅन्टोन्मेंटचे कर्मचारी, लायन्स क्लब स्कूल व महात्मा फुले प्राथमिक शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते.
सीईओ अभिजीत सानप म्हणाले की, सर्वांना स्वच्छता अभियान राबवून नागरिकांना स्वच्छतेची सवय लागली पाहिजे. रस्त्यावर कचरा न करण्याचे आपले कर्तव्य आहे. त्यामुळे नागरिकांनी कचर्याचे वर्गीकरण करूनच तो दिला पाहिजे. तसेच सर्वांनी वृक्षारोपण केले पाहिजे. वाढदिवस असेल किंवा कोणतीही शुभ घटना असेल तर वृक्षरोपण करूनच तो साजरा केला पाहिजे. वॉर्ड क्रमांक एकमध्ये सर्वत्र रस्त्यावरील कचरा उचलण्यात आला. बोर्ड सदस्य शेलार यांनी प्रास्ताविकात वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्याचा हेतू मांडला. नरवाल यांनी मनोगत व्यक्त केले. बोर्ड अध्यक्ष वैष्णव यांनी पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व मांडले. निशांत शेख यांनी सूत्रसंचालन केले. आरोग्य निरीक्षक किरण गोंटे यांनी आभार मानले.
अनेक बोर्ड सदस्यांची उपस्थिती
वृक्षारोपण कार्यक्रमाला प्रधान संचालक उपस्थित असतानाही बोर्ड सदस्य रघुवीर शेलार वगळता कँन्टोमेंटच्या उपाध्यक्षा सारिका नाईकनवरे यांच्यासह सर्व सदस्य यावेळी अनुपस्थित होते. तसेच विकासकामे करण्यास निधी नसल्याचे कारण पुढे करण्यात येत असताना मंडप आदी अनावश्यक खर्च कऱण्यात येत असल्याबद्दल समितीचे सोलोमन भंडारी, राजु मारीमुत्तू यांनी काळे झेंडे दाखवून निषेधाच्या घोषणाबाजी केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.