देहुरोड परिसरातील पुलासाठी सामाजिक कार्यकर्तें वसंत भसे यांनी घेतले उपोषण मागे

0

अनेक वर्ष रखडलेल्या पुलाचे लवकरच सुरू करू
सार्वजनिक बांधकाम विभागाने दिले आश्‍वासन
देहुरोड : गेल्या आठ वर्षांपासून देहुरोड परिसरातील सांगुर्डी गावातील पुलाचे काम रखडले आहे. कित्येकदा निवेदन देऊनही यावर कारवाई करण्यात येत नव्हती. या पुलासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला होता. तरीही यावर काही आदेश विभागाने दिला नाही. त्यासाठी सांगुर्डी येथील ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्ते वसंत भसे यांनी उपोषण सुरू केले होते. या रखडलेल्या पुलाचे काम त्वरित पूर्ण करण्यात यावे, या मागणीसाठी भसे यांनी उपोषण केले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने दिलेल्या लेखी आश्‍वासनानंतर शनिवारी हे उपोषण मागे घेण्यात आले. या वेळी माजी आमदार दिलिप मोहिते, बाजार समितीचे सभापती चंद्रकांत इंगवले, हवेली पंचायत समितीचे माजी सदस्य बाळासाहेब काळोखे, देहूचे माजी उपसरपंच प्रकाश हगवणे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक मारूती भसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कैलास सांडभोर, कृष्णा भसे, भीमराव चव्हाण, राजू भसे यांच्यासह सांगुर्डी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

दोन दिवसांनी उपोषण मागे
खेड तालुक्यातील सांगुर्डी येथे सांगुर्डी-बोडकेवाडी दरम्यान इंद्रायणी नदीवरील अर्धवट व प्रलंबित असणार्‍या पुलाचे काम हे सुधारीत पद्धतीने पूर्ण व्हावे, या मागणीसाठी दोन दिवसांपासून उपोषण सुरू होते. खेड येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता बी. पी. क्षीरसागर आणि कनिष्ठ अभियंता एस. एस. पवार यांच्या लेखी आश्‍वासनानंतर दोन दिवसांनी उपोषण मागे घेण्यात आले. उपोषणकर्ते भसे यांच्या मागणीनुसार ग्रामस्थ व तांत्रिक बाबींचा विचार करून कार्यवाही करण्याची लेखी हमी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी यावेळी उपोषणकर्त्यांना देण्यात आली. यावेळी क्षीरसागर म्हणाले की, काही तांत्रिक अडचणींमुळे या पुलाचे काम रखडले आहे. ती तांत्रिक प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी थोडा कालावधी जरूर लागेल. ही मंजुरी मिळाली की तातडीने काम पूर्ण केले जाईल.

लवकर काम पूर्ण होणार
सांगुर्डी गावचे ग्रामस्थ असलेल्या भसे यांनी सांगितले की, या पुलाच्या कामासाठी अनेकदा राज्य सरकारच्या सामाजिक बांधकाम विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. सतत अर्ज घेऊन जायचे आणि अधिकार्‍यांना विनंती करायची असे सुरू होते. मात्र केवळ आश्‍वासने मिळत होती. गावातील नागरिकांची या पुलामुळे मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे मी उपोषणाचा मार्ग वापरून माझे म्हणणे सामाजिक बांधकाम विभागाकडे मांडण्यासाठी मी उपोषणास बसलो. त्यानंतर विभागाच्यावतीने लेखी आश्‍वासन देण्यात आले. लवकरात लवकर हे काम पूर्ण करण्याबद्दल त्यांनी सांगितले आहे.