प्रस्थान सोहळ्यासाठी घ्यावे लागणार पास
देहूरोडः संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज मंदीरातील पालखी प्रस्थान सोहळ्याला होणारी अनावश्यक गर्दी कमी करण्यासाठी यावर्षी संत तुकाराम संस्थानच्यावतीने निमंत्रितांसाठी पास देण्यात येणार आहे. भजनी मंडपातील क्षमतेनुसार पासचे वाटप करून त्याची नोंद ठेवण्यात यावी असे निर्देश पोलीस प्रशासनाच्यावतीने सोहळाप्रमुखांना देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे रस्त्यात अन्नदान, विविध वस्तुंच्या वाटपासाठी उभारण्यात येणार्या मंडप आणि स्वागत कमानींना सुरक्षेच्या कारणावरून परवानगी देण्यात येणार नसल्याचे पोलीस अधिक्षक सुवेझ हक यांनी देहु येथे संयुक्त बैठकीत स्पष्ट केले. आषाढी वारीनिमित्त श्री संत तुकाराम महाराजांचा 333 वा पालखी सोहळा 5 जुलै रोजी देहुतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस प्रमुख सुवेझ हक यांच्या प्रमुख उपस्थित आज देहु येथे बैठक घेण्यात आली.
या प्रसंगी अतिरिक्त अधिक्षक तेजस्वी सातपुते, उपविभागीय पोलीस अधिकारी गणपतराव माडगुळकर, तहसीलदार गीतांजली शिर्के, हवेली पंचायत समिती सभापती हेमलता काळोखे, सरपंच उषा चव्हाण, देहूरोडचे पोलीस निरीक्षक प्रकाश धस, ग्रामविकास अधिकारी अर्जुन गुडसुरकर, पालखी सोहळा प्रमुख सुनिल मोरे, अशोक मोरे आणि विठ्ठल मोरे, विश्वस्त अभिजीत मोरे, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष विशाल खंडेलवाल, कार्यालय अधिक्षक श्रीरंग सावंत तसेच ग्रामपंचायतीचे सदस्य, विविध शासकीय विभागांचे प्रतिनिधी व ग्रामस्थ उपस्थित होते.
पोलिसांनी केल्या महत्त्चाच्या सूचना
सोहळा निर्विघ्न पार पडावा यासाठी पोलिसांच्यावतीने महत्त्वाच्या सूचना ग्रामपंचायत आणि संस्थान तसेच पालखी सोहळा प्रमुखांना करण्यात आल्या. यामध्ये काही उपक्रम यवर्षी प्रथमच राबविण्यात येणार आहेत. वाहतूक व्यवस्था, वाहनतळ, गर्दीचे नियोजन, चोरीच्या घटना रोखण्यासाठी उपाय, अतिक्रमण, वीजपुरवठा, इंद्रायणी घाटावर जीवरक्षकांची नेमणूक आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. माडगुळकर यांनी प्रास्ताविक केले. गुडसूरकर यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.
असे आहे पालखी प्रस्थान सोहळ्याचे नियोजन
इनामदारवाडा, अनगडशाह वली दर्गा आणि चिंचोली पादुका मंदीर येथे सोनसाखळ्या हिसकावण्याचे प्रकार रोखण्यासाठी खबरदारी.
पालखी रथाची आरटीओ आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तज्ज्ञांद्वारे तपासणी. एसटी आणि पीएमपी यंदा संतकृपा मंगल कार्यालयापर्यंतच धावणार. प्रस्थानाच्या मुख्य सोहळ्यासाठी क्षमतेनुसार भाविकांना मंदिरात सोडणार. पासधारकांनाच प्रवेश. संपुर्ण सोहळ्यावर दोन ड्रोन कॅमेर्यांद्वारे ठेवणार लक्ष. यात्रा काळात गर्दीच्या ठिकाणी सीसीटिव्ही कॅमेर्यांद्वारे वॉच, भाडेतत्वावर घेणार कॅमेरे.
वारकर्यांना साहित्य वाटप करण्यासाठी थाटण्यात येणार मंडप व स्वागत कमानींना परवानगी नाही. एकाच ठिकाणाहुन नियंत्रीत होणारी ध्वनीक्षेपक व्यवस्था. रस्त्यात पार्कींग असलेल्या वाहनांना लागणार जॅमर. यात्रा काळात देहुत नो-हॉकर्स झोनची संकल्पना राबविणार.