पुढील वर्ष निवडणुकीचे असल्यामुळे आयोजनावर दिसून येत आहे प्रभाव
अनेक ठिकाणी सेलिब्रेटी लावणार हजेरी
देहूरोड : सण-उत्सवांमधील पारंपरिक बाज दिवसेंदिवस मागे पडत चालला असून नव्या जमान्यात या सणांना इव्हेंटचे स्वरूप येत चालले आहे. मुंबई-पुण्याच्या धरतीवर आत हे फॅड ग्रामीण भागात पाय पसरू लागले आहे. देहूरोड परिसरात यंदा याची चाहुल लागण्यास सुरूवात झाली आहे. दहीहंडी उत्सवाच्या आयोजकांमध्ये शहरात टोकाची स्पर्धा दिसून येत आहे. त्यातूनच लाखांची बक्षीसे आणि सेलिबे्रटींचे आकर्षण यावर अधिक भर दिला जात असल्याचे चित्र आहे. देहूरोड येथे यावर्षी प्रथमच दहीहंडी उत्सवाची धूम पहायला मिळणार आहे. पुढील वर्ष हे निवडणुकीचे वर्ष असल्यामुळे त्याचाही प्रभाव साहजिकच या उत्सवाच्या आयोजनावर दिसू लागला आहे.
तीन मंडळांची मोठी बक्षिसे
यावर्षी शहरात तीन मोठी दहीहंडी उत्सव मंडळे मोठी बक्षीसे घेऊन स्पर्धेत उतरली आहेत. यापैकी शिवसेना सर्वाधिक 11 लाख 11 हजार 111 चे बक्षीस घेऊन स्पर्धेत उतरली आहे. या पाठोपाठ शितळानगर येथे मैत्री ग्रुपची हंडी आहे. या ठिकाणी पाच लाख पाच हजारांचे बक्षीस ठेवण्यात आले असून अनेक सिलेब्रेटींची हजेरी लागणार आहे. शहरात ठिकठिकाणी या उत्सवाचे जाहिरात फलक लावण्यात आले आहेत. गेली चार वर्षे बाजारपेठेच्या मध्यवर्ती भागात सागर लांगे मित्र परिवार यांच्या भगवी दहीहंडी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यावर्षी या दहहंडीसाठी तीन लाख तीन हजाराच्या बक्षीसाची घोषणा करण्यात आली होती. मात्र, नंतर हि रक्कम पाच लाख करण्यात आली. त्यामुळे उत्सवातील स्पर्धा तिव्र झाल्याचे दिसून येत आहे. सोशल मिडीयावर उत्सवाच्या आयोजकांमधील वाक्युध्द टोकाला पोहचले आहे. जसजसा उत्सव जवळ येऊ लागला आहे तसतसे हे युध्द अधिक तिव्र होताना दिसत आहे. भगवी हंडी उत्सव समितीने ढोललेझीम स्पर्धेचे आयोजन केले असून हिंदी मराठी सिनेसृष्टीतील मॉडेल्स्चे रॅम्पवॉक हि संकल्पना राबविण्यात येणार असल्याचे जाहिर केले आहे.
पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष
दहीहंडी उत्सवात आलिकडच्या काळात वाढलेले आणखी एक फॅड म्हणजे डिजीटल साऊंड यंत्रणा. पायाखालच्या जमीनीवर हादरे अनुभवतील असे मोठ्या आवाजाचे ध्वनीक्षेपक लावले जातात. शहरातील सर्वात मोठ्या दहीहंडीच्या आयोजकांनी यावर्षी पुण्यातील नामवंत डिजेला पाचारण केले आहे. शहरातील ही सर्वात महाग सुपारी असल्याची चर्चा आहे. कमी-अधिक प्रमाणात सर्वच दहीहंडी मंडळांकडे जोरदार साऊंड सिस्टम राहणार आहे. ग्रामीण हद्दीतून मुक्त होऊन देहूरोड पोलीस ठाणे सध्या पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात समाविष्ट झाले आहे. आयुक्तालयामुळे या ठिकाणी सण-उत्सवात मोठा पोलीस बंदोबस्त मिळणार आहे. नुकत्याच झालेल्या बकरी ईदमध्ये याची अनुभूती नागरिकांनी घेतली आहे. त्यामुळे दहीहंडी उत्सवातही मोठा पोलीस बंदोबस्त राहिल, यात शंकेला वाव नाही. मात्र, डिजेच्या आवाजाबाबत शहर पोलीस नेमकी काय भूमिका घेतात याबाबत अद्याप भूमिका स्पष्ट नाही.