देहूरोड : देहूरोड कॅन्टोन्मेंट परिसरातील काही भागांमध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून पाणीपुरवठा केला जातो. हा पुरवठा कमी दाबाने होत आहे. त्यामुळे काही भागात टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. त्यामुळे महापालिकेने जास्त दाबाने पाणीपुरवठा करावा. यामागणीसाठी मावळचे आमदार बाळा भेगडे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौर नितीन काळजे व आयुक्त दिनेश वाघमारे यांची भेट घेतली. येत्या आठ दिवसात या भागाची पाहणी होऊन जिथे पाणी पोहोचू शकत नाही तिथे पाईप टाकण्यास व महापालिकेने सहानुभूती म्हणून पाणी वाढवावे, अशी मागणी भेगडे यांनी केली. यासह नागरिकांनीही पाणी जपून वापरावे, असे आवाहनही त्यांनी केले.
विचार करू, तुर्तास निर्णय नाही
यासाठी आयोजित बैठकीला सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, नगसेविका सीमा सावळे, भाजपचे सरचिटणीस सारंग कामतेकर, महापालिकेचे पाणीपुरवठा अधिकारी, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अधिकारी, देहूरोडचे नागरिक आदी उपस्थित होते. यावेळी नागरिकांनी महापौरांना निवेदनही दिले. दरम्यान, महापौर काळजे यांनी आम्ही या संदर्भात विचार करणार आहोत. तुर्तास तरी काही निर्णय नाही. अधिकार्यांशी यासंदर्भात चर्चा करण्यात येईल. पवना धरण हे सध्या 49 टक्क्यांवर पोहोचले आहे. त्यामुळे भविष्यात शहरालाच एक दिवसाड पाणी पुरवठा करावा लागणार अशी स्थिती असताना शहराला कितपत देहूरोड परिसरासाठी पाणी पुरवठा वाढवता येईल याबाबत मात्र शंका व्यक्त केली जात आहे.