देहूरोडमध्ये दोन गटात तुफान राडा

0

देहूरोड : तलवारी, हॉकी स्टिक, कोयते अशी धारदार हत्यारे हातामध्ये घेऊन देहूरोडमध्ये दोन गटांमध्ये तुफान राडा झाला. याप्रकरणी परस्परविरोधी फिर्याद देण्यात आली असून दोन गटातील काही जणांना अटक केली आहे. ही घटना मंगळवारी (दि.21) दुपारी चारच्या सुमारास देहूरोड येथील आबुशेट रोडवर घडली. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून देहूरोडमध्ये मारामारीचे मोठ्या प्रमाणात घटना घडत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

…हे आहेत अटकेत
राहुल कैलास विश्वकर्मा (वय 20, रा. मामुर्डीगाव, देहूरोड) याने दिलेल्या फिर्यादीनुसार, कालिदास शिलुराज आयगाप्री (वय 26), अमीर उर्फ वाडी समीर शेख (वय 24, दोघे रा. गांधीनगर, देहूरोड) या दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांचे साथीदार सोनू उर्फ डुंगा, महादेव ठेस, हमीद, विनोद उर्फ चुहा, शेर्‍या व इतर पाच ते सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी हातामध्ये धारदार हत्यारे घेऊन दुचाकीवरुन आबुशेट रोडवर फिरत दहशत माजविली. आरोपी महादेव, वाडी व हमिद यांनी फिर्यादी राहुल याला मोठ्याने ओरडून “याला पकडा असे म्हणत शिवीगाळ केली. याला आता जिवंत सोडायचा नाही, याचे दुकान फोडा” असे म्हणत त्याच्या दिशेने धावत गेले. फिर्यादी पळून जात असताना आरोपी हमिद याने त्याला जोरात लाथ मारली, असे फिर्यादीत नमूद आहे.

…परस्परविरोधी तक्रार
विकी शिवाजी गणेशन (वय 20, रा. गांधीनगर, देहूरोड) याने दिलेल्या फिर्यादीनुसार राहुल कैलाश विश्वकर्मा (वय 20), रईस मुनीर शेख या दोघांना अटक करण्यात आली आहे. नबी (पूर्ण नाव समजू शकले नाही) याच्यासह त्यांच्या 10 ते 15 साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपी मंगळवारी दुपारी तलवार, कोयते, लोखंडी पाईप, लाकडी दांडके घेऊन देहूरोड येथील अबूशेट रोडवर आले. फिर्यादी विकी याला “तुम गांधीनगर के लोगो को बहोत मस्ती आई है” असे म्हणत लोखंडी रॉडने कपाळावर मारहाण केली, असे फिर्यादीत नमूद केले आहे. देहूरोड पोलिस पुढील तपास करीत आहेत.