आमदार बाळा भेगडे यांची मागणी
देहूरोड : तीर्थक्षेत्र देहु-देहूरोड येथील रस्त्याने श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पिंपरी-चिंचवड परिसरामध्ये प्रवेश करीत असतो. या सोहळ्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून लाखोंच्या संख्येने वारकरी उपस्थित रहातात. अधिकमासामुळे यावर्षी पालखी सोहळा काहीसा पुढे ढकलला गेलाय. अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या या सोहळ्यासाठी देहु-देहुरोड परिसरातील पालखी मार्गाचे रुंदीकरण करावे, अशी मागणी केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितिन गडकरी यांच्याकडे करण्यात आली आहे. आमदार बाळा भेगडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने गडकरी यांची भेट घेतली. यावेळी श्रीक्षेत्र देहूगाव-देहुरोड मार्गे-श्री क्षेत्र पंढरपूर या प्रस्तावित पालखी सोहळा मार्गाच्या रूंदीकरणा बाबत चर्चा केली.
पालखी मार्गाचा विकास करावा
आमदार भेगडे यांनी सांगितले की, देहू हे पालखी सोहळा मार्गाचे उगमस्थान आहे. देहू ते झेंडेमळा सोळाशे मीटरचा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असून, त्यापुढील देहूरोड दरम्यानचा रस्ता लष्काराकडे आहे. राज्याच्या कानाकोपर्यातून येणारे लाखो भाविक याच मार्गाने येत असून, पालखी सोहळा याच मार्गाने जातो व परत येत असतो. तीर्थक्षेत्रांबरोबर पालखी मार्गाचे विकास करण्याची योजना असताना पालखी उगम रस्त्यांचे त्वरीत रूंदीकरण व विकास करण्याची मागणी परिसरातील स्थानिक नागरिकांकडून, समाजसेवी संस्थांकडून, विविध मंदिर-देवस्थानांकडून होत आहे.
रस्त्यासाठी अधिकार्यांना सूचना
केंद्रीय रस्ते विकासमंत्री गडकरी यांनी सांगितले की, महाराष्ट्राला संत परंपरेचे मोठे देणे आहे. आषाढीवारी हा असाच एक अलौकिक सोहळ्याची परंपरा श्री संत तुकाराम महाराज यांनी घालून दिली आहे. 15 दिवसांच्या अथक प्रवासाने पंढरपुरच्या श्री विठोबाच्या दर्शनाला जाणार्या वारकर्यांसाठी अनेक सोयी-सुविधा दिल्या जात आहेत. देहू-देहूरोड परिसरातील हा प्रस्तावित रस्ता खरच या सोहळ्यासाठी कमी पडतो. त्यामुळे हा रस्ता लवकरात लवकर तयार झाला पाहिजे. या पालखी मार्गाचे काम लवकरात सुरू करण्याचे आदेश संबंधित अधिकार्यांना दिले आहेत.
यावेळी गडकरी यांनी देहुरोड शहरातील उड्डाणपुलाच्या व देहुरोड ते निगडी या रस्त्याच्या उद्घाटनासाठी वेळ देणार असल्याचे सांगितले. कँटोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष विशाल खंडेलवाल, तळेगावच्या नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, लहुमामा शेलार, बाळासाहेब शेलार, अंजनी बत्तल, तळेगावचे नगरसेविका शोभा भेगडे, नगरसेवक संग्राम काकडे, संदीप काकडे, सुधीर आढागळे आदी उपस्थित होते.