देहूरोडला दूरध्वनी सेवा ठप्प असल्याने व्यापारी त्रस्त

0

देहूरोड : पुणे-मुंबई महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामानिमित्त करण्यात आलेल्या खोदाईमुळे बाजारपेठेतील शेकडो दूरध्वनी बंद पडले होते. यापैकी काहींची सेवा पूर्ववत झाली असली तरी अद्यापही निम्म्या बाजारपेठेतील दूरध्वनी बंद असल्याने व्यापारी वैतागले आहेत. दूरसंचार विभागाच्या कार्यालयातून मात्र, केवळ 45 दूरध्वनी बंद असल्याचे सांगण्यात आले. महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला डिसेंबर 2016 मध्ये सुरूवात झाली. त्यानंतर जानेवारी 2017 मध्ये खोदकामाला सुरूवात झाली. त्यात अनेक भूमिगत दूरध्वनी वाहिन्या या तुटल्या.

तीन महिन्यांपासून सेवा खंडित
भारत संचार निगमने यातील काहींची दुरूस्ती केली असली तरी बाजारपेठेतील गुरुद्वारा, रेल्वेचाळ, सराफा बाजार, सुभाष चौक या भागातील दूरध्वनी तीन महिने झाले तरी नादुरुस्त असल्याच्या तक्रारी व्यपार्‍यांनी केल्या आहेत. यासंदर्भात बीएसएनएलचे उपविभागीय अभियंता डी. एस. बोरोले यांनी सांगितले की, महामार्गाच्या खोदकामामुळे दूरध्वनी वाहिन्या अनेक ठिकाणी तुटल्या आहेत. काही ठिकाणी तर दुरूस्ती करुनही पुन्हा या वाहिन्या तुटल्या आहेत. या प्रकारामुळे दुरुस्तीसाठी घालवलेला वेळ व मनुष्यबळाची मेहनत वाया जाते. त्यामुळे ज्या भागात केबल वारंवार तुटण्याची भीती आहे, अशा ठिकाणी थोड्या उशीरा दुरस्ती केली जाणार आहे. शहरात एकूण 1 हजार 750 दूरध्वनी ग्राहक असून यापैकी केवळ 45 दूरध्वनी बंद असल्याचे बोरोले यांनी सांगितले.

डॉ.आंबेडकर रुग्णालयाचा दूरध्वनीही बंदच
दूरध्वनी बंद पडल्याचा फटका कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयालाही बसला आहे. या रुग्णालयाचा दूरध्वनी अनेक दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे वेळी अवेळी रुग्णवाहिका किंवा रुग्णालयातील विविध कामांबाबात दूरध्वनीवरुन संपर्क साधणार्‍या नागरिकांना केवळ दूरध्वनीची रिंग ऐकू येते. मात्र, तासन्तास फोनच उचलला जात नाही, अशी परिस्थिती आहे. यासंदर्भात रुग्णालयाच्या कर्मचार्‍यांनी तत्काळ बीएसएनएलकडे तक्रार करून दूरध्वनी सुरू करावेत, अशा सूचना बोर्डाचे कार्यालय अधीक्षक श्रीरंग सावंत यांनी दिल्या आहेत. त्याचप्रमाणे नागरिकांची असुविधा टाळण्यासाठी आता रुग्णालयात 8888892740 या पर्यायी क्रमांकावर संपर्क साधता येईल, अशी माहिती सावंत यांनी दिली.

मागील तीन महिन्यांपासून दूरध्वनी बंद पडल्यामुळे व्यापारासंबंधी संपर्क साधणे अवघड झाले आहे. पेठेतील सर्वच दुकानदारांची दूरध्वनी सेवा बंद असल्यामुळे परवड झाली आहे.
-प्रदीप पारेख, सराफा व्यावसायिक

केवळ बाजारपेठेतच नव्हेतर महामार्गालगतच्या भागातही अनेक ठिकाणी दूरध्वनी बंद आहेत. दूरध्वनी सेवा बंद पडल्यामुळे वायफाय सेवाही बंद पडली आहे. त्यामुळे ऑनलाईन कामे करणार्‍या संस्थांना तसेच व्यवसायाला चांगलाच फटका बसला आहे.
-डॉ. शालक अगरवाल, माहिती अधिकार कार्यकर्ता