देहूरोड । भीमा कोरेगाव येथील घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी सर्वच दलित संघटना व राजकीय पक्षांच्यावतीने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. त्याला देहु, देहूरोड, विकासनगर, मुकाई चौक, किवळे रावत, आळंदी तळेगाव दाभाडे परिसरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सर्वत्र कडकडीत बंद पाळण्यात आला. दवसभरात विविध आंबेडकरी विचारांच्या संघटना तसेच राजकीय पक्षांनी निषेध फेरी, रॅली काढून भिमा कोरेगाव घटनेचा निषेध व्यक्त केला. औषधे आणि जीवनावश्यक वस्तुंना या बंदमधून सूट देण्यात आली होती. मंगळवारी रात्री विविध संघटनांच्या प्रमुख नेत्यांनी बैठकीत आंदोलनाची दिशा निश्चित केली होती. त्यानुसार सकाळी 11 च्या सुमारास ऐतिहासिक धम्मभूमी येथून रॅलीला सुरूवात झाली.
बुध्दविहार कृती समितीचे अध्यक्ष टेक्सास गायकवाड, धम्मभूमी सुरक्षा समितीचे अशोक गायकवाड, बापूसाहेब गायकवाड, आरपीआयचे सिध्दार्थ चव्हाण, बाबु दुधघागरे, माऊली सोनवणे, सुनिल कडलक, जावेद शेख आदी प्रमुख पदाधिकार्यांनी त्याचे नेतृत्व केले. भारिप बहुजन महासंघ आणि स्वाभिमानी रिपब्लीकन पक्षाच्यावतीने देहूरोड ते लोणावळा रॅली काढण्यात आली होती. शहरातील सर्व दुकाने भाजीमंडईतील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. शहरातील इंग्रजी माध्यमाच्या तसेच विविध खासगी संस्थांच्या शाळांना सुट्टी देण्यात आली होती. दुपारी बाजारपेठेतील सुभाष चौकात रॅलीचे रूपांतर निषेध सभेत झाले. यावेळी मान्यवरांनी तिव्र शब्दांत निषेध नोंदविला.
आळंदीत बंद 100 टक्के यशस्वी
महाराष्ट्र बंदला आळंदी शहरात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. शहरात 100 टक्के बंद यशस्वी झाला. शहरातील व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. या बंदमधून अत्यावश्यक सेवा मात्र वगळण्यात आली. आळंदीतील प्रमुख बाजारपेठा, मंदिर परिसर, नगरप्रदक्षिणा मार्ग, भैरवनाथ चौक परिसर, देहू फाटा परिसरात देखील दुकाने बंद ठेवण्यात आली होती. कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी आळंदी पोलिसांनी प्रमुख चौका-चौकात चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. आळंदीतील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ बुधवारी सकाळी सर्व दलित संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते जमले होते. यामध्ये महिलांची उपस्थिती मोठी होती. येथून निषेध मोर्चाला प्रारंभ झाला. नगरपरिषद चौक, महाद्वार चौक, चाकण चौक, घुंडरे आळी, भैरवनाथ चौक, मरकळ रस्ता, आवारी हॉस्पिटल, दत्त मंदीरमार्गे मोर्चा स्मारकाजवळ परतला. याठिकाणी आळंदी पोलिसांना विविध मागण्यांचे निवदन देण्यात आले. यावेळी विश्वनाथ थोरात, संतोष डोळस, संदीप रंधवे, डॉ. निलेश रंधवे, योगेश रंधवे, काशिनाथ रंधवे, मैनाजी रंधवे, भीमराव थोरात आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
उर्से टोलनाक्यावकळ रास्ता रोको
महाराष्ट्र बंदला तळेगाव शहर परिसरातून उत्फुर्त प्रतिसाद मिळाला. मात्र शासकीय कार्यालये, बँका, विविध कंपन्या व अत्यावश्यक सेवा चालू होत्या. दुकाने, बाजारपेठ, उपहारगृहे, हॉटेल्स, शाळा इ. बंद ठेवण्यात आल्या होत्या. शहरातील रिक्षा वाहतूक आणि पीएमपीएलच्या बस सेवेच्या फेर्या कमी करण्यात आल्या होत्या. पुणे-मंबई महामार्ग आणि द्रुतगती महामार्गावरील वाहतूकही तुरळकपणे चालू होती. बंदमध्ये सहभागी झालेल्या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी, लिंब फाटा, उर्से टोलनाका याठिकाणी जाऊन काही काळ वाहतूक रोखून धरली. रस्त्यावर टायर जाळले. तसेच काही वाहनांवर तुरळक दगडफेक करण्याच्या घटना घडल्या. तळेगाव एसटी डेपोतून सुटणार्या सर्व गाड्या बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्यांना सुरक्षीतपणे आगर आणि बस स्थानकात उभ्या केल्या होत्या. भीमसैनिकांनी बंद शांततेत पार पाडल्याबद्दल मावळचे आमदार बाळा भेगडे यांनी आभार व्यक्त केले.