देहूरोड कॅन्टोन्मेंटच्या रुग्णालयाबाहेर महिलेने दिला बाळाला जन्म

0

देहूरोड : डॉक्टरांवरील हल्ल्यांचा एकीकडे देशभरातून निषेध होत असताना डॉक्टरांच्या कामाबाबत चीड निर्माण व्हावी, असा प्रकार शनिवारी रात्री देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात घडला. प्रसववेदनेने पीडित असलेल्या महिलेला आता मूल होणार नाही, असे सांगून तळेगाव जनरल रुग्णालयात जाण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. मात्र, रुग्णालयाच्या पायर्‍या उतरून रस्त्यावर येताच या महिलेने बाळाला जन्म दिला. या प्रकारानंतर मात्र, डॉक्टरांची भंबेरी उडाली. बोर्डाचे अधिकारी यासंदर्भात काय कारवाई करतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

अंदाज चुकलेल्या डॉक्टरांची चांगलीच उडाली भंबेरी
इमारत बांधकामांवर मजुरी करणारी मेनुका रविकुमार राठोड ही शनिवारी रात्री दहाच्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात प्रसव वेदनेने पीडित अवस्थेत आली होती. मात्र, तिच्याकडे गरोदरपणाच्या कुठल्याही तपासण्यांची यादी नव्हती. तसेच ती केवळ सात महिन्यांची गरोदर होती. ही प्राथमिक माहिती घेतल्यावर येथील रात्रपाळीतील डॉक्टरांनी तिला तळेगाव येथील सरकारी रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. तिच्या पतीन डॉक्रांचा सल्ला मान्य करीत पत्नीला तळेगाव येथे नेण्याचे मान्य केले. मात्र, रुग्णालयाच्या पायर्‍या उतरुन येताच या महिलेने बाळाला जन्म दिला. रुग्णालयाच्या आवारातच घडलेल्या या प्रकारामुळे अंदाज चुकलेल्या डॉक्टरांची चांगलीच भंबेरी उडाली. या महिलेला बाळासह ताबडतोब रुग्णालयातील वॉर्डमध्ये हलविण्यात आले.

ती केवळ सात महिन्यांची गरोदर
या प्रकाराबाबत रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. त्र्यंबक वाघचौरे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, संबंधित महिलेची प्रसूती नॉर्मल झाली आहे. ती केवळ सात महिन्यांची गरोदर असल्याने तसेच तिच्या वेदनांची तीव्रता कमी असल्यामुळे तेथे असलेल्या डॉक्टरांनी तिला तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला दिला होता. मात्र, अचानक हा प्रकार घडला. प्रकार घडला त्यावेळी कामावर हजर असलेले डॉ. अहमद सामी हे जनमाणसांत चांगल्या सेवेमुळे लोकप्रिय आहेत. त्यांनी मात्र या प्रकाराविषयी कुठलीच प्रतिक्रिया व्यक्त करण्याचे टाळले.

बालक सुदृढ असल्यामुळे थेट मातेकडे सोपविले
दरम्यान संबंधित महिलेचे बाळ सुखरूप असून त्याचे वजन 1.7 किलोग्रॅम असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सात महिन्यांमध्ये जन्मलेली बहुतेक बालके कमजोर असतात, मात्र, हे बालक त्यापेक्षा सुदृढ असल्यामुळे त्याला थेट मातेकडे देण्यात आल्याचे सांगण्यात आले. माता व बालक व्यवस्थित असल्याचे रुग्णालयातून सांगण्यात आले.

प्रकरणाची माहिती घेणार
डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात घडलेल्या प्रकाराची माहिती घेण्यात येणार आहे. रविवारी सुटीचा दिवस असल्यामुळे शनिवारी कर्तव्यावर असलेल्या कर्मचार्‍यांची भेट होऊ शकली नाही. लवकरच या प्रकाराची सखोल माहिती घेऊन त्याचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना सादर करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया आरोग्य समितीच्या सभापती सारिका नाईकनवरे यांनी दिली.