देहूरोड : केंद्र सरकारकडून एक जुलैपासून ‘जीएसटी’ (वस्तू व सेवाकर) ही नवीन करप्रणाली लागू झाल्यामुळे देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाने बंद केलेले जकात नाके तब्बल महिन्यानंतर पुन्हा सुरू झाले आहेत. देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतून जाणार्या वाहनांकडून प्रवेशकर वसुलीचे काम या नाक्यांवर करण्यात येणार आहे. महिनाभर कुलूपबंद असलेले जकात नाके मागील दोन दिवसांपासून साहित्याची जमवाजमव आणि कामाच्या लगबगीमुळे पुन्हा गजबजले आहेत. या जकात नाक्यांवर आता पूर्वीप्रमाणे वाहन प्रवेशकर वसुली होणार आहे.
वाटाघाटीनंतर सुटका तिढा
केंद्र सरकारच्या वतीने देशभरात एक जुलैपासून वस्तू व सेवा कर (जीएसटी) ही नवी करप्रणाली सुरू झाली. त्यामुळे देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाने आपल्या हद्दीतील जकात नाके बंदे केले होते. मात्र, वाहन प्रवेश कराबाबत जीएसटीच्या संदर्भ सूचित स्पष्ट उल्लेख नसल्यामुळे संभ्रम निर्माण झाला होता. बर्याच वाटाघाटीनंतर हा तिढा सुटला असून, आता वाहन प्रवेशकर वसुलीचा मार्ग मोकळा झाला. पुणे आणि खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाने एक ऑगस्टपासूनच प्रवेशकर वसुली सुरू केली आहे. त्यापाठोपाठ आता देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डानेही गुरुवारी मध्यरात्रीपासून (3 ऑगस्ट) प्रवेशकर वसुली सुरू केली आहे.
गुरुवारपासून उघडले नाके
देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे निगडी, शंकरवाडी, शितळानगर, झेंडेमळा येथील जकात नाके पूर्वीप्रमाणे सुरू करण्यासाठी गेल्या तीन दिवसांपासून लगबग सुरू होती. एक जुलैनंतर जकात नाके बंद करण्यात आले होते. त्यामुळे जकात नाक्यांच्या ठिकाणी असलेल्या इमारतींमधून फर्निचर, वीज पुरवठा आदी सुविधा काढून टाकण्यात आल्या होत्या. मागील दोन दिवसांत त्या पूर्ववत करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू होते. गुरुवारी सर्व नाक्यांवरील खिडक्या उघडण्यात आल्या होत्या. दिवसभर कर्मचारी नाक्यांमध्ये बसून होते. मात्र, वसुली करण्यात येत नव्हती. मध्यरात्री 12 वाजेपासून ही वसुली सुरू होणार असल्याचे कर्मचारी वाहनचालकांना सांगत होते.
नव्या दरांनुसार कर आकारणी
दरम्यान, महिनाभराच्या कालावधीनंतर सुरू होणार्या नाक्यांवर वाहन प्रवेशकराचे सुधारित दर फलक लावण्यात आले आहेत. रविवारी सायंकाळी तातडीची बैठक घेऊन या दरवाढीचा निर्णय घेण्यात आला होता. नव्या दरांनुसार हलक्या प्रवासी वाहनांसाठी एक बाजुच्या प्रवासासाठी 40 रुपये, एकाच दिवशी दोन्ही बाजुच्या प्रवासासाठी 60 रुपये असे शुल्क राहणार आहे. तर मासिक पासची सुविधाही उपलब्ध राहणार असून त्यामध्ये महिनाभर एका खेपेसाठी 1500 रुपये, दररोज दोन खेपांसाठी 2500 आणि तीन खेपांसाठी 3000 रुपये असे दर राहतील. प्रवासी बससाठी एका बाजुच्या प्रवासासाठी दिवसाला 70 रुपये, एकाच दिवसात जाणे-येण्यासाठी 100 रुपये आकारण्यात येतील. मासिक पाससाठी दररोज एक खेपेसाठी 2100, दोन खेपांसाठी 3700 आणि तीन खेपांसाठी 5000 रुपये दर निश्चित करण्यात आले आहेत. मालमोटारी व तत्सम वाहनांसाठी एका खेपेसाठी 100 रुपये, एकाच दिवशी जाण्या-येण्यासाठी 1500 रुपये शुल्क भरावे लागणार आहे. मासिक पाससाठी सरसकट पाच हजार रुपये निश्चित करण्यात आले असून त्यात खेपांची अट नसल्याचे सांगण्यात आले.