सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या दर्जा बाबत माहिती कळवा अवघ्या एका क्लिकवर
देहूरोड : सार्वजनिक स्वच्छतागृहाचा दर्जा कसा आहे, याबाबत कॅन्टोन्मेंट प्रशासनाला विना सायास कळविता येणार आहे. त्यासाठी सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या बाहेर बोर्डाने बायोमेट्रीक यंत्रे बसविली आहेत. देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाने नुकताच हा उपक्रम सुरू केला आहे. स्वच्छ सर्वेक्षणमध्ये सहभागी झाल्यामुळे बोर्डाने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. नागरिकांकडून मात्र या उपक्रमाबाबत संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसत आहेत.
कन्टोन्मेंटचा अभिनव उपक्रम
आपल्या भागातील स्वच्छतागृह कसे आहे हे प्रशासनाला कळविण्याची सुविधा खुद्द प्रशासनानेच नागरिकांना उफलब्ध करून दिली आहे. देहूरोड कॅन्टोन्मेंटचा हा अभिनव उपक्रम मानला जात आहे. बोर्डाने यासाठी सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या इमारतीबाहेर बायोमेट्रीक यंत्रे बसविली आहेत. या यंत्रावर तांबडे, पिवळे आणि हिरवे अशी तीन बटन आहेत. या स्वच्छतागृहांचा वापर करणार्या नागरिकांनी स्वच्छतागृहाच्या दर्जाबाबत आपले मत या तीन बटनांपैकी एक दाबुन प्रशासनाला कळवायचे आहे. अत्याधुनिक यंत्रणा असल्यामुळे नागरिकांच्या प्रतिक्रिया थेट बोर्डाच्या आरोग्य विभागात कळू शकणार आहेत. अस्वच्छ, बरे आणि चांगले अशी या तीन रंगाच्या बटनांनुसार वर्गवारी करण्यात आली आहे. कुठल्या रंगाचे बटन कितीवेळा दाबले गेले यातून बोर्डाला येथील परिस्थितीची सत्यता जाणून घेता येणार आहे.
प्रायोगिक तत्वावर उपक्रम
सध्या प्रायोगिक तत्वावर काही स्वच्छतागृहांबाहेर हे यंत्र लावण्यात आले आहे. मात्र, नागरिकांकडून त्याचा वापर केला जात नसल्याचे समोर आले आहे. नागरिकांनी जास्तीत जास्त प्रतिक्रिया कळवाव्यात त्यांची तत्काळ दखल घेतली जाईल, अशी माहिती बोर्डाकडून देण्यात आली आहे. आता नागरिक या बायोमेट्रीक यंत्राचा कितपत वापर करतील हे आगामी काळात समोर येणार आहे.
वापरात नसलेल्या स्वच्छतागृहावरही बसविले यंत्र
स्वच्छ सर्वेक्षणाचा एक भाग म्हणून कॅन्टोन्मेंट बोर्डाने शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या इमारतीवर बायोमेट्रीक यंत्रे बसविली आहेत. मात्र, काही ठिकाणी केवळ सोपसरापुरतीच हि यंत्रणा लावण्यात आल्याचे चित्र आहे. रेल्वेस्थानक रस्त्यावर दाभाडेचाळ परिसरात गेले वर्षभरापासून सार्वजनिक स्वच्छतागृहाच्या नवीन इमारतीचे बांधकाम सुरू आहे. हे काम अर्धवट असल्यामुळे अद्याप हे स्वच्छतागृह नागरिकांना वापरासाठी बंद आहे. सुरूच न झालेल्या या स्वच्छतागृहाजवळही प्रशासनाने बायोमेट्रीक यंत्र बसविले आहे. त्यामुळे जिथे स्वच्छतागृहच सुरू नाही तिथे प्रतिक्रिया काय कळवायच्या असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.