विकासकामांसाठी आता आठ कोटींचा खर्च
देहूरोड – देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचा 2018-19 चा अर्थसंकल्प बोर्डाच्या सर्वसाधारण सभेत मंजुर करण्यात आला. मात्र, या अर्थसंकल्पात केवळ साडेबारा कोटी खर्च करण्यासाठी मिळतील. यापैकी साडेचार कोटी शाळा बांधकामांवर खर्च होणार असल्यामुळे विकासकामांवर केवळ आठ कोटी रुपये एवढाच मर्यादित खर्च करता येईल, अशी ढोबळ माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत सानप यांनी या बैठकीत दिली. मात्र, या अर्थसंकल्पाची प्रत माध्यमांच्या प्रतिनिधींना देण्यात आली नाही. बैठकीच्या अध्यक्षस्थानी ब्रिगेडियर ओ. पी. वैष्णव होते. बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत सानप, उपाध्यक्ष विशाल खंडेलवाल, सदस्य रघुवीर शेलार, सारिका नाईकनवरे, गोपाल तंतरपाळे, ललित बालघरे, अॅड. अरुणा पिंजण, लष्करी सदस्य गॅरिसन इंजिनियर सी. विनयकुमार, लेफ्टनंट कर्नल राजवीर लोध, कॅप्टन राहुल गर्ग आदी बोर्ड सदस्यांसह कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या विविध विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
विषय पत्रिकेवरील विषय चर्चेसाठी
गुरूवारी दुपारी झालेल्या या बैठकीत मुळ विषयपत्रिकेवर असलेल्या 15 विषयांवर मॅरेथॉन चर्चा झाली. मात्र, पुरवणी विषय पत्रिकेवरील विषय सविस्तर चर्चिण्यात आले. या पुरवणी विषयपत्रिकेच्या प्रती माध्यम प्रतिनिधींना देण्यात आल्या नव्हत्या. विषयपत्रिकेवरील विषयांमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन, संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात सहभागी दिंड्यांचे स्वागत व दिंड्यांना तंबु वाटप, मोशी कचरा डेपोत बोर्डाचा कचरा टाकणे, वाहनचालक पदांची भरती, शहरातील स्वच्छतेसाठी सफाईच्या कंत्राटाची निवीदा काढणे, भांडार विभागातील विविध साहित्य खरेदी, बाक खरेदी, इंग्रजी माध्यमाचा सातवीचा वर्ग सुरू करणे, पाणी पुरवठा योजना चालविण्याच्या कंत्राटाचे नुतनीकरण, आणि 2018-19 ते 2019-20 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आदी विषयांचा समावेश होता.
अतिरिक्त खर्चाला मान्यता देण्यासाठी
दरम्यान, बोर्डाचे तांत्रिक सल्लागार असलेले गॅरिसन इंजिनियर मेजर सी. विनयकुमार यांनी बोर्डाच्या टेंडर प्रक्रिया आणि प्रत्यक्ष काम झाल्यानंतर होणारा वाढीव खर्च याबाबत हरकत घेतली. यापुर्वी बोर्डाने एम. बी. कॅम्प, शितळानगर आदी ठिकाणी अतिक्रमण टाळण्यासाठी तारेचे संरक्षक कुंपण घातले आहे. या कामासाठी प्रस्तावित खर्चापेक्षा अधिक खर्च करण्यात आला. त्यामुळे अतिरिक्त खर्चाच्या रकमेला मंजुरी मिळण्याचा विषय मांडण्यात आला होता. त्यावर सी. विनयकुमार यांनी नाराजी व्यक्त केली. त्याचप्रमाणे बोर्डाद्वारे होणार्या निवीदा प्रक्रियेत ठेकेदारांकडून निर्धारित दरापेक्षा अधिक दराने भरलेल्या निवीदा ममजुर केल्या जात असल्याबद्दलही त्यांनी आक्षेप नोंदवला. असा प्रकरणांत नाहरकत देण्यास त्यांनी असमर्थता व्यक्त केली.
विकासकामे ठप्प झाल्याने सदस्य नाराज
देहूरोड कॅन्टोन्मेंटच्या विद्यमान सदस्यमंडळाचा कार्यकाल 2020 मध्ये संपणार आहे. विद्यमान सदस्यांना नागरी कामे करण्यासाठी केवळ एक वर्षाचा कालावधी आहे. त्यामुळे सदस्यांनी विकासकामे सुरू करण्यासाठी अधिकार्यांकडे तगादा लावला आहे. गुरूवारी झालेल्या बैठकीत हि बाब दिसून आली. उपाध्यक्ष विशाल खंडेलवाल यांनी कामेच ठप्प झाली असल्याने नागरिकांमध्ये रोष असल्याचा मुद्दा उपस्थित केला. तंतरपाळे, बालघरे, पिंजण, शेलार यांनीही आपापल्या वॉर्डातील कामे सुरू करण्यात यावी अशी मागणी लावून धरली.