देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाची स्पर्धेला परवानगी

0

क्रिकेटशौकिनांचा झाला खेळ अन् झाडांचा गेला बळी

तोडलेल्या झाडांची जबाबदारी कुणाची?

देहूरोड : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या एम.बी.कॅम्प येथील महात्मा गांधी शाळेच्या मैदानावर नुकतेच देहूरोड प्रिमीयर लीग ही सहा षटकांच्या सामन्यांची क्रिकेट स्पर्धा नुकतीच पार पडली. या स्पर्धेदरम्यान मैदानाच्या सीमेवर लावण्यात आलेल्या झाडांचा मात्र बळी गेला आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाने झाडांभोवती लावलेल्या संरक्षक जाळ्यांचीही तोडफोड झाली आहे. ही मोडतोड कोणी केली, यावर बोर्ड काय भूमिका घेणार याबाबत चौकशी केली असता असमधानकारक उत्तरे देण्यात आली. देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या महात्मा गांधी शाळेच्या मैदानावर गेल्या आठवड्यात देहूरोड प्रिमियर लिग क्रिकेट स्पर्धा झाली. सहा दिवस चाललेल्या या स्पर्धेला क्रिकेट रसिकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून संबंधित जागेच्या भाड्यापोटी अनामत रक्कम भरून संयोजकांनी परवानगीही घेतली होती. त्यामुळे तशी ही स्पर्धा निर्धोक झाली. पण स्पर्धा संपल्यावर मैदानावरील झाडांची झालेली दुर्दशा समोर आली.

महामार्गाच्या रूंदीकरणात शेकडो झाडांची कत्तल करण्यात आली होती. या कत्तलीबाबत जबाबदार धरून रस्ते विकास मंडळ आणि संबंधित रस्ता रूंदीकरण करणारे ठेकेदार यांच्याविरुध्द न्यालयात दाद मागण्यात आली. प्रकरण खूपच चिघळले आणि संबंधितांनी कत्तल केलेल्या झाडांच्या बदल्यात प्रत्येकी एका झाडासाठी तीन झाडे लावण्याची हमी दिली. त्यातूनच बोर्डाच्या मालकीच्या या मैदानावर सुमारे दिडशे झाडे वर्षभरापूर्वी लावण्यात आली. ही झाडे आता चांगली वाढली आहेत. या झाडांना संरक्षणासाठी जाळ्याही लावण्यात आल्या आहेत. मात्र, नुकत्याच झालेल्या क्रिकेट स्पर्धेदरम्यान काही विघ्नसंतोषी प्रेक्षकांकडून तर काही ठिकाणी खेळाडूच्या धक्क्यातून अपघाताने या जाळ्या पडल्या आहेत. त्यामुळे आतील झाडांची नासधूस झाली आहे. काही ठिकाणी प्रेक्षकांनी या जाळ्या वाकवून त्याचा बसण्यासाठी उपयोग केल्याचे चित्र आहे. स्पर्धा संपूण तीन दिवस लोटले तरी या भागातील नुकसानीकडे बोर्डाच्या एकाही कर्मचार्‍याने ढुंकूनही पाहिले नाही. काही जागरूक नागरिकांनी पुढारीकडे याबाबत तक्रार केली. मोठ्या न्यायालयीन लढ्यामुळे जीवदान मिळालेल्या या झाडांची अशा निर्दयीपणे नासधूस करण्यास कोण जबाबदार आहे. आयोजकांवर बोर्ड काय कारवाई करणार, त्यांच्याकडून झाडांची भरपाई घेणार का, असे अनेक प्रश्‍न उपस्थित केले जाऊ लागले आहेत. यासंदर्भात माहिती घेण्यात येणार असून संबंधितांकडून यानुकसानीची भरपाई घेण्यात येईल. भविष्यात अशा स्पर्धांना परवानगी देताना आयोजकांकडून हमीपत्र घेण्यात येईल, अशी शिफारस करणार असल्याचे विद्यमान बोर्ड सदस्य विशाल खंडेलवाल यांनी सांगितले.

अनामत रकमेतून नुकसान भरपाई

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे प्रभारी कार्यालय अधिक्षक पंढरीनाथ शेलार यांनी सांगितले की, या स्पर्धेसाठी परवानगी दिली असली तरी मैदानातील झाडांची काळजी घेण्याची जबाबदारी संबंधित आयोजकांची होती. यापुढे हे मैदान कुणालाही भाड्याने न देण्याचा प्रस्ताव आगामी बोर्ड बैठकीत मांडण्यात येणार आहे. झाडे तोडली गेली आहेत. केंद्र सरकार आणि राज्य सरकार वृक्षारोपणासाठी आवाहन करीत आहेत. सर्व राज्यामध्ये सामाजिक वनीकरण मोहिम सुरू आहे. तरीही या स्पर्धा आयोजकांनी झाडे का तोडली ठाऊक नाही. त्या आयोजकांनी बोर्डाकडे अनामत रक्कम भरली आहे. त्यातून झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यात येणार आहे.