देहूरोड परिसरातील एटीएम केंद्रांमध्ये ठणठणाट!

0

देहूरोड : देहूरोड परिसरात असलेल्या एकूण 22 एटीएम केंद्रांपैकी बहुतांश एटीएम केंद्रांमध्ये पैशांचा ठणठणाट असल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या पाच-सहा दिवसांपासून ही परिस्थिती कायम आहे. त्यामुळे पैशांसाठी नागरिकांची फिराफिर होत आहे. गरजेवेळी पैसे मिळत नसल्याने नागरिकांना असंख्य अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. ज्या एटीएम केंद्रात पैसे आहेत; तेथे पैसे काढण्यासाठी एटीएमबाहेर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागत असून, या रांगांमुळे नोटाबंदीच्या काळातील आठवणी ताज्या झाल्याचे नागरिक सांगत आहेत.

पाच ते सहा दिवसांपासून हाल
देहूरोड परिसरातील बहुतांश एटीएम केंद्रांवर गेल्या पाच ते सहा दिवसांपासून खडखडाट आहे. नोकरपेशा लोकांना कामाच्या वेळेत बँकेत जाऊन पैसे काढणे, त्यासाठी रांगेत उभे राहणे, शक्य नसते. अशा लोकांसाठी एटीएम हा सर्वात उत्तम पर्याय आहे. परंतु नोटाबंदीच्या काळात ही केंद्रे अंत पाहणारी ठरली. दिवसा कामावरून थकून आलेल्या चाकरमान्यांना रात्री उशिरापर्यंत एटीएमबाहेरच्या रांगेत थांबावे लागत होते. त्यातुनही नंबर आलाच तर एटीएम यंत्रात पैसे असतीलच याची खात्री नसे. सुमारे दीड महिना ही परिस्थिती कायम होती. आता सर्व यंत्रणा सुरळीत झाल्यानंतरही तशीच परिस्थिती पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे.

‘नो-कॅश’चे संदेश लागले
गेल्या पाच ते सहा दिवसांपासून अनेक एटीएममध्ये ‘नो-कॅश’चे संदेश लावलेले दिसत आहेत. ज्या एटीएममध्ये कॅश भरली जाते; तिथे ग्राहकांची अशी झुंबड उडते की, काही तासातच ही कॅश संपते. या प्रकारामुळे नागरिक पुरते वैतागले आहेत. एटीएममधून नागरिकांना विनासायास पैसे मिळाले पाहिजेत. स्वतःचेच पैसे घेण्यासाठी एवढा त्रास सहन करणे अयोग्य आहे. त्यामुळे या विषयावर लवकरच संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांशी चर्चा करणार असल्याचे राष्ट्रवादीचे माजी अध्यक्ष मिकी कोचर यांनी सांगितले.