देहूरोड : मावळ तालुक्यातील देहुरोड परिसरात साप पकडणार्या स्वयंघोषीत सर्प मित्रांचा अक्षरशः सुळसुळाट झाला आहे. कुठलेही तंत्र अवगत नसताना ही मंडळी केवळ हिरोगिरीसाठी स्वतःचा आणि सापांचा जीव धोक्यात घालत असल्याचे समोर आले आहे. आततायीपणाने सापांच्या जीवाशी खेळ करू नये, असे आवाहन अनेक वर्षांपासून या क्षेत्रात सेवा बजावणार्या सर्पमित्रांनी केले आहे.
मागील आठवड्यात घडलेल्या दोन घटनांनी शहरातील स्वयंघोषीत सर्पमित्रांची पोलखोल झाली आहे. रेल्वेस्थानकात निघालेल्या सापाला पकडताना पत्रकारांनी संबंधित सर्पमित्राला या सापाबद्दल विचारले तेव्हा हा साप साधा आहे, असे मोघम उत्तर दिले. तर दुसर्या घटनेत सर्पमित्राने बिनविषारी सापाची माहिती देताना चक्क विषारी आणि नागीन असल्याचे सांगितले. अतिशय क्रुरपणे हे दोन्ही साप पकडण्यात आले. दोन्ही सापांच्या मानेजवळ या कथीत सर्पमित्रांनी प्रचंड दाब देऊन पकडल्याचे दिसुन आले. खरेतर हा प्रकारच अतिशय चुकीचा असल्याचे या क्षेत्रात अनेकवर्षे काम करणारे सर्पमित्र व अभ्यासक योगेश गायकवाड यांनी सांगितले.
पकडण्यात आलेले दोन्ही साप तस्कर जातीचे होते. या जातीचा साप लाजाळू स्वभावाचा आणि बिनविषारी असतो. भीतीपोटी किंवा वातावरणातील बदलामुळे तो बाहेर पडला असेल, त्याला सुरक्षितपणे पकडून नैसर्गिक अधिवासात सोडणे आवश्यक आहे. साप पकडताना किमान तो विषारी आहे की बिनविषारी हे देखील माहित नसणारे लोक अशाप्रकारचे धाडस करून सापाच्या आणि स्वतःच्याही मृत्युला निमंत्रण देत आहेत, असे सर्पमित्रांनी सांगितले.अर्थात ज्यांनी हे साप पकडले ते दोन्ही स्वयंघोषीत सर्पमित्र आपण अनेक वर्षांपासुन साप पकडत असल्याचे छातीठोक सांगताहेत. ज्यांना सापाचा प्रकार कळत नाही, असे लोक सर्पमित्र कसे असू शकतात, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. वनविभागाने अशा लोकांवर कडक कारवाई करायला पाहिजे, असा सूर उमटू लागला आहे.
वनविभागाच्या दुर्लक्षामुळे गल्लोगल्ली झालेत सर्पमित्र
मुळात वनविभागाचे अशा स्वयंघोषीत सर्पमित्रांकडे दुर्लक्ष होणे हिच गंभीर बाब असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. निसर्गचक्रात सापांचे स्थान अत्यंत महत्वपूर्ण असल्यामुळे साप जगविणे गरजेचे आहे. नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या प्राण्यांच्या यादीत साप विशेषतः नागाचा अ वगारत समावेश आहे. अशा प्राण्याच्या मृत्युस कारणीभूत ठरल्याचे निदर्शनास आल्यास कठोर कारवाईची आणि शिक्षेची तरतूद आहे. मात्र, वनविभागाकडून अशी कारवाई केलीच जात नसल्यामुळे या क्षेत्रात दिवसागणिक भामट्या सर्पमित्रांची भर पडत चालली आहे.