देहूरोड। देहूरोड परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या खूप वाढली आहे. शहराच्या काही भागात कुत्रे चावण्याच्या अनेक घटना मागील काही दिवसांत घडल्या आहेत. आता भटक्या कुत्र्यांचा त्रास थेट लष्करी भागात वाढला आहे. या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा, अशी सूचना लष्करी अधिकार्यांकडून कॅन्टोन्मेंट बोर्डाला करण्यात आली असल्याची माहिती मिळाली आहे. देहूरोड परिसरात कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील शितळानगर, आंबेडकरनगर, गांधीनगर, शिवाजीनगर तसेच बाजारपेठ आणि पारशीचाळ परिसरात भटक्या कुत्र्यांचा त्रास वाढला आहे. या परिसरात जवळपास दिडशेच्यावर मोकाट कुत्र्यांचा वावर असुन रात्री अपरात्री कामावरुन परतणारे कामगार, शालेय विद्यार्थी तसेच लहान मुलांना या कुत्र्यांमुळे धोका निर्माण झाला आहे. पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या हद्दीतील एम. बी. कॅम्प परिसरातही मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली आहे.
भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांना धोका
कॅन्टोन्मेंट कार्यालयापासुन डीएडी डेपो-एमईएस कार्यालय-अशोकनगर-देहूफाटा या सुमारे तीन किलोमीटर मार्गावर रोज सकाळी व सायंकाळी नागरिक, ज्येष्ठ नागरिक तसेच लष्करी अधिकारी जॉगींग करतात. या मार्गावर भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांना धोका निर्माण झाला असल्यामुळे अधिकार्यांनी याबाबत बोर्डाकडे मागणी केली असल्याचे सूत्रांनी सांगितले. काही दिवसांपुर्वी शितळानगर, एम. बी. कॅम्प आणि विकासनगर भागात मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात जवळपास पंधरा नागरिक जखमी झाले होते. पालिकेने या प्रकाराची दखल घेत मोहिम राबवून भटक्या कुत्र्यांना पकडले. मात्र, कॅन्टोन्मेंट बोर्डाने यावर अद्याप कुठलीही कारवाई केली नसल्याचे समजते. दरम्यान, भटक्या कुत्र्यांचा प्रादुर्भाव आता लष्करी अस्थापना व वसाहतींपर्यंत पोहचला आहे. लष्कराच्या स्थानिक मुख्यालयाने याबाबत नुकतेच बोर्डाला पत्र दिले असून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी त्यात करण्यात आली असल्याचे समजते.
प्रक्रिया महागडी
कॅन्टोन्मेंट बोर्डाचे कार्यालय अधिक्षक श्रीरंग सावंत यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. यासंदर्भात प्रशासन गंभीर असून पिंपरी-चिंचवड भागात मोकाट कुत्री पकडून निर्बिजीकरण करणार्या संस्थेशी बोलणी सुरू असल्याचे सावंत यांनी सांगितले. ही प्रक्रिया अतिशय महागडी असून प्रत्येक कुत्र्याच्या निर्बीजीकरणासाठी सुमारे तीन हजार खर्च असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, संबंधित संस्थेमार्फत कुत्री पकडून त्यांचे निर्बीजीकरण झाल्यावर सोडून देण्याची सर्व प्रक्रिया करण्यात येणार असून पंधरा दिवस संस्थेचे संबंधित पथक देहूरोड परिसरात कारवाई करणार असल्याचेही सांगण्यात आले.