देहूरोड परिसरात मराठा क्रांती मोर्चासाठी जय्यत तयारी

0

देहूरोड : देहूरोड आणि देहू परिसरातून मुंबई येथे मराठी क्रांती मोर्चासाठी सुमारे दीड हजार मोर्चेकरी जाण्याची शक्यता आहे. मात्र, ऐनवेळी या आकड्यात फेरबदल होण्याची शक्यता आहे. बहुतांश आंदोलक आपापल्या खासगी वाहनांतून मुंबईच्या दिशेने जात आहेत. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर या वाहनांची सर्वाधिक वर्दळ दिसत आहे. मराठा क्रांती मोर्चासाठी देहू आणि देहूरोड परिसरातून मोर्चेकर्‍यांची जय्यत तयारी झाली आहे. रात्री उशिरा किंवा पहाटे आपापल्या खासगी वाहनांनी मोर्चासाठी निघणार असल्याचे बहुतेक मोर्चेकर्‍यांनी सांगितले.

संख्येचा अंदाज बांधणे कठीण
यासंदर्भात मागील आठवड्यात बैठक होणार होती. पण ती न होऊ शकल्यामुळे गावपातळीवर आपसांत ठरवून मोर्चेकरी निघतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, बुधवारी मावळ गोळीबार घटनेचा स्मृतिदिन आहे. या स्मृतिदिनासाठी जास्तीत जास्त संख्येने मावळातून ग्रामस्थ उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे मोर्चासाठी नेमके किती लोक निघणार, याचा अंदाज बांधणे कठीण आहे.

ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त
पुणे व पिंपरी-चिंचवडसह पुण्याबाहेरून येणार्‍या मोर्चेकर्‍यांची बहुतांश वाहने द्रुतगती मार्गानेच जाणार आहेत. काही प्रमाणात ती मंगळवारपासूनच जात आहेत. बुधवारी अचानक वाहनांची गर्दी वाढण्याची शक्यता असल्यामुळे टोलनाक्यावर ही वाहने टोल न घेता सोडली जाणे शक्य आहे. द्रुतगती मार्गावर बंदोबस्त वाढविण्यात येणार असल्याची माहिती देहूरोडचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणपतराव माडगुळकर यांनी दिली. विभागातील तळेगाव, देहूरोड आणि पौड ही तिन्ही पोलीस ठाणी महामार्गालगत असल्यामुळे जुना मुंबई-पुणे महामार्ग, कात्रज बाह्यवळण मार्ग आणि यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर पोलीस ठाण्यांच्या पातळीवर बंदोबस्त तैनात करण्यात येणार असल्याचेही माडगुळकर यांनी सांगितले.

कामशेतला अल्पोपहाराची व्यवस्था
कामशेत येथे मावळ गोळीबार घटनेचा स्मृतिदिन साजरा करण्यात येणार आहे. मावळातून मोठ्या संख्येने नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे मुंबईकडे जाणार्‍या मोर्चेकर्‍यांसाठी याच ठिकाणी चहापाणी व अल्पोपहाराची सोय करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. देहूरोड येथे महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू असल्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडीची शक्यता आहे. त्यामुळे शहरात एकाही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले नसल्याचे विशाल खंडेलवाल यांनी सांगितले.