देहूरोड : गणेशोत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी देहूरोड पोलिसांनी परिसरात मॉक ड्रील घेतले. बुधवारी सायंकाळी पाच वाजता आंबेडकरनगर, गांधीनगर परिसरात हे मॉक ड्रील घेण्यात आले. दंगल भडकणे, आग किंवा मोठा अपघात अशी आपत्कालीन घटना घडल्यास पोलीस प्रशासन, अग्निशामक दल व आरोग्य विभाग किती दक्ष आहे, याची चाचपणी करण्यात आली. दंगलीच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवणे, जमावाला काबूत ठेवणे, आगीवर नियंत्रण, जखमींना तातडीने रुग्णालयात पोचवणे आदी सर्व प्रकाराचे यावेळी प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.
ठिकठिकाणी संचलन
देहूरोड बाजार, पारशी चाळ, एम. बी. कॅम्प, विकासनगर, किवळे, मामुर्डी, शितळानगर या परिसरामध्ये संचलन करण्यात आले. या सरावात उपविभागीय पोलीस अधिकारी जी. एस. माडगुळकर, पोलीस उपनिरीक्षक दुर्योधन पवार तसेच पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. तसेच, सरकारी जीप, एडीएम मोबाईल व्हॅन, आधार हॉस्पिटलची रुग्णवाहिका, कॅन्टोन्मेंट बोर्ड अग्निशामक दलाची गाडी तसेच देहूरोड विभागातील तळेगाव, तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे एक अधिकारी आणि पाच कर्मचारीदेखील सहभागी झाले होते.