देहूरोड : विशेष प्रतिनिधीदेहूरोड पोलीस ठाण्याच्या आवारात रघुविर शेलार स्नेह ग्रुपच्यावतीने पोलिसांसाठी रक्षाबंधन कार्यक्रम घेण्यात आला. वॉर्ड क्रमांक 1 मधील 13 बचत गटांच्या महिला आणि माई बालभवन या अंध व अपंगासाठी काम करणार्या संस्थेतील महिला व मुली या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. देहूरोड पोलीस ठाण्यात पोलीसांसाठी आयोजित रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात पार पडला.
देहूरोड उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणपतराव माडगुळकर, देहूरोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरूण मोरे, उपनिरीक्षक अबुबकर लांडगे, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सदस्य रघूविर शेलार, सामाजिक कार्यकर्ते धर्मपाल तंतरपाळे, माई बालभवनचे मधुकर इंगळे, रघूविर शेलार स्नेहगु्रपचे पदाधिकारी आणि महिला उपस्थित होत्या. प्रत्येक सणाच्यावेळी पोलिसांना कर्तव्यावर जावे लागते, त्यामुळे सगळ्याच सणांपासून ते दूर राहतात. अशावेळी घरापासून दूर असलेल्या पोलिसांना या सणाचा आनंद उपभोगता यावा, यासाठी गेले तीन वर्षे अव्याहतपणे रक्षाबंधनचा पोलिसांसाठी कार्यक्रम घेतला जातो, असे यावेळी बोर्ड सदस्य रघुवीर शेलार यांनी सांगितले.
माला महिला बचत गटातील महिलांनी स्वागत गीत, रक्षाबंधनचे महत्व सांगणार्या कविता सादर केल्या. समाजातील सर्वच घटकांचे रक्षण करणे पोलीसांचे कर्तव्य आहे, पोलीस हे कर्तव्य बजावतच असतात, असे यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी माडगुळकर म्हणाले. महिलांच्या बाबतीत कुठलीही कुचराई केली जात नाही, आणि केली जाणार नाही. तक्रारींसाठी महिला थेट संपर्क साधु शकतात, असे आवाहन यावेळी त्यांनी केले. यावेळी पोलीस निरीक्षक मोरे, रघुवीर शेलार यांनी मनोगत व्यक्त केले. देहूरोड पोलीस ठाण्याच्या आवारात स्वयंसहाय्यता गटाच्या महिला आणि अंध विद्यर्थिनींनी पोलीसांना राख्या बांधल्या.