देहूरोड : देहू आणि देहूरोड परिसरातील सुमारे 104 सार्वजनिक तसेच घरगुती गणपतींचे भावपूर्ण वातावरणात विविध घाटांवर विसर्जन झाले. यंदा मूर्तीदान उपक्रमाला उदंड प्रतिसाद लाभला. ढोल-ताशा, बँड पथके आणि बँजो पार्टीच्या दणदणाटात विसर्जन मिरवणुका काढण्यात आल्या. बाजारपेठेतील बहुतांश सार्वजनिक गणेशमंडळानी सायंकाळी लवकरच विसर्जन केले. त्यामुळे रात्री विसर्जन मिरवणुका पाहणयासाठी आलेल्या भाविकांचा अपेक्षाभंग झाला. देहूरोड बाजारपेठेतील मानाचा गणपती म्हणून प्रख्यात असलेल्या शिवस्मारक गणपतीचे दुपारी बारा वाजता विसर्जन झाले. त्यापूर्वी विश्वस्त मंडळी आणि स्थानिक व्यापार्यांनी बँडच्या साथीने फुलांच्या सजविलेल्या पालखीतून बाप्पांची मिरवणूक काढली. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास नवशक्ती चैतन्य मित्र मंडळाच्या गणपतीची मिरवणूक सुरू झाली. विसर्जन रांगेत सुदर्शन मंडळ, महात्मा फुले अखिल मंडई मंडळ, अजिंक्य मंडळ, हनुमान मंडळ, रेल्वे कॉलनी न्यु गोल्डन ग्रुप आदी मंडळे सहभागी झाली होती. रात्री साडेदहापर्यंत बाजारपेठेतील मिरवणुका पूर्ण झाल्या होत्या.
पथकांनी जिंकली मने
विकासनगरात मिरवणुका उशिरा सुरू झाल्या. श्री कॉलनी मित्र मंडळ, जागृत मित्र मंडळ, क्रांती मित्र मंडळ, श्री कृष्ण मित्र मंडळ, शिव मित्र मंडळ, हनुमान मित्र मंडळ, श्री शिवछत्रपती तरूण मित्र मंडळ, शिवशाही मित्र मंडळ रांगेत होती. विविध मैदानी खेळांची प्रात्यक्षिके आणि मानवी मनोरे सादर करीत ढोल-ताशा पथकांनी सर्वांची मने जिंकली. यावर्षी बहुतांश मंडळांनी भंडार्याची उधळण केली. विकासनगर चौकात युवाशक्ती फाउंडेशनच्या वतीने मंडळांच्या स्वागतासाठी स्वागत कक्ष उभारला होता. बाजारपेठेतील महात्मा फुले अखिल मंडई मंडळाने फुलांच्या पाकळ्यांची उधळण केली. देहूत सहा मंडळे मिरवणूक रांगेत होती. मात्र, चिखली, कुदळवाडी, तळवडे, निगडी या भागातून अनेक मंडळे गणपती विसर्जनासाठी देहूत दाखल झाली होती.
85 टक्के मूर्ती दान
सकाळपासून इंद्रायणीच्या घाटावर विसर्जनासाठी गर्दी होती. रायगड जिल्ह्यातील नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, विश्वकल्याण कामगार संघटना (टाटा मोटर्स, चाकण), रोटरी क्लब ऑफ देहू आणि देहू ग्रामपंचायत यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सुमारे 85 टक्के गणेशमूर्तींना इंद्रायणीत केवळ आचमन करून मूर्तीदान करण्यात आले. या मुर्तींचे नंतर दगडाच्या खाणीतील पाण्यात विसर्जन करण्यात आले. किवळे, सांगावडे, वाल्हेकरवाडी (रावेत) आदी घाटांवर गणपती विसर्जन झाले.