तिसर्या दिवशी घसा झाला ओला : फिजिकल डिस्टन्स पाळण्यावर भर तर काही ठिकाणी उडाला बोजवारा
भुसावळ : तब्बल 45 दिवसानंतर बंद असलेली दारू दुकाने मंगळवारी खुली झाली असलीतरी तळीरामांच्या वाढत्या गर्दीसह अप्रिय घटना टळण्यासाठी शहरातील परवानगी मिळालेल्या तीन वाईन शॉप चालकांनी दुकाने उघडण्याचे टाळले होते तर एका दुकानदाराने बुधवारी दुकान उघडताच गर्दी उसळली व घरूनच ग्राहकांनी आलेल्या टोकनमुळे दुकानदारासह पोलिसांचा मनस्ताप वाढल्याने पाच ते दहा ग्राहकांना मद्य विकल्यानंतर दुकानदाराने दुकान बंद केले होते मात्र गुरुवारी आधीच्या तीन व पुन्हा अन्य दोन दुकानदारांना परवानगी मिळाल्यानंतर सकाळपासून तळीरामांनी मद्य दुकानांबाहेर गर्दी केल्याचे चित्र होते. तळीरामांची गर्दी नियंत्रीत करण्यासाठी दुकानदारांनी मनुष्यबळ वाढवले होते. काही ठिकाणी फिजिकल डिस्टन्स पाळण्यात आले असलेतरी काही ठिकाणी त्याचा बोजवारा उडाल्याचे दिसून आले. दोन दिवसांच्या प्रतीक्षेनंतर का होईना तिसर्या दिवशी तळीरामांचा घसा ओला होणार असल्याने सर्वच दुकानांबाहेर दे दारू… दे दारूचे चित्र दिसून आले.
शहरात आता पाच दुकानांना परवानगी
शहरातील आठ वाईन शॉप पैकी तीन वॉईन शॉपला मद्य विक्रीसाठी परवानगी देण्यात आली असलतरी वाढत्या गर्दीमुळे दुकाने उघडली नाहीत तर बुधवारी दुपारी बाजारपेठ पोलिस ठाण्याजवळील दुकानावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. ग्राहकांना कागदावर नाव, पत्ता, नंबर व मालाचा तपशील असा टोकन देण्यात येणार होते. यावर दुकानाचा शिक्का मारुन देण्यात येणार होते. मात्र काही बहाद्दरांनी घरुनच कागदावर ही माहिती लिहून आणली. ग्राहकांनी अधिक प्रमाणात मद्याची मागणी केली. यामुळे सुरवातीचे पाच ते सात ग्राहक केल्यानंतर दुकानदाराने तत्काळ दुकान बंद केल्याने सलग दोन दिवस तळीरामांचा हिरमोड झाल्याने काहींनी ग्रामीण भागासह जिल्ह्याचे ठिकाण गाठून घसा ओला केला तर काहींना आल्या पावल्या घरी परतावे लागले.
गुरुवारी दुकानांबाहेर उसळली गर्दी
शहरातील आठ पैकी आता एकूण पाच वाईप शॉप दुकानांना मद्य विक्रीची परवानगी देण्यात आली आहे तर आणखी दोन बियर विक्रीच्या परवानगीदेखील वाढवून देण्यात आल्याने गुरुवारी सकाळी मद्य दुकानांबाहेर तळीरामांच्या रांगा लागल्याचे चित्र होते. दरम्यान, गुरुवारी सकाळी गर्दी असलीतरी दुपारनंतर मात्र गर्दी ओसरल्याचे चित्र दिसून आले.