दैनंदिन जीवनात स्काऊटिंगचे उपक्रम आजच्या पिढीला उपयुक्त : भूषण गोखले

0

पुणे । स्वत: कष्ट केल्याशिवाय कोणत्याही कामात यश मिळत नाही. स्काऊटिंगच्या माध्यमातून शिकलेल्या सर्व गोष्टी कायम लक्षात ठेवल्यास त्याचा भविष्यकाळात आजच्या पिढीला नक्कीच उपयोग होईल. आयुष्यात असे कार्य प्रत्येकाने करायला हवे, ज्यामुळे आपल्या आई-वडिलांना आणि देशाला अभिमान वाटेल, असे प्रतिपादन एअरमार्शल (निवृत्त) भूषण गोखले यांनी केले.

श्री शिवाजी कुल या पुण्यातील पहिल्या स्काऊट-गाईड खुल्या पथकाच्या शताब्दी वर्ष उद्घाटन मेळाव्याचे आयोजन सदाशिव पेठेतील पंतसचिव स्काऊट क्रीडांगण येथे करण्यात आले होते. यावेळी पक्षीतज्ज्ञ किरण पुरंदरे, नायक्रोम इंडिया लि.चे संस्थापक संचालक रमेश जोशी, संस्थेचे कुलमुख्य आदित्य धायगुडे, श्रेया मराठे, पुष्कर भराडिया, कुलसप्ताह समितीप्रमुख शिवाजी रोडे यांच्यासह आजी व माजी कुलवीर, पालकवर्ग उपस्थित होते. कार्यक्रमात शतगौरवार्थींचा सन्मान, स्काऊटची प्रात्यक्षिके आणि श्री शिवाजी कुल-खरी कमाई या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.

क्रीडाप्रकार आत्मसात करा
आयुष्यात कितीही मोठे यश संपादन केले, तरीसुद्धा आपले पाय जमिनीवर असणे आवश्यक आहे. तसेच स्वत:चा विचार करीत असताना समाजाचा देखील विचार करणे आवश्यक आहे. स्वत:साठी कार्य करीत असताना समाजासाठी देखील कार्य करा. आपण शारिरीक संपन्नता म्हणजेच खेळांमध्ये कमकुवत असून चालणार नाही. त्यामुळे स्काऊटिंगचे शिक्षण घेता घेता विविध क्रीडाप्रकार देखील मुला-मुलींनी आत्मसात करायला हवेत, असे भूषण गोखले यांनी सांगितले.

निसर्गाची काळजी घ्या
निसर्गाने निर्माण केलेल्या सुंदर गोष्टींचा अनुभव घेण्यासाठी विविध ठिकाणी फिरा. सह्याद्रीच्या डोंगर रागांना भेटल्यावर आपल्याला समजते की निसर्गाने प्राणी, पक्षी, झाडे अशा अनेक गोष्टी भररभरून दिल्या आहेत. या दरम्यान, आपल्यामुळे निसर्गाला हानी पोहोचणार नाही याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असे किरण पुरंदरे यांनी सांगितले. निसर्गाची काळजी आपणच घेतली पाहिजे. निसर्गाचे रक्षण करण्यासाठी प्रत्येकाने झाडे लावली पाहिजेत, असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमात बालगटासह कब, बुलबुल, स्काऊट, गाईड विभागाची नयनरम्य प्रात्यक्षिके सादर झाली. कार्यक्रम कुलसप्ताह या क्रीडा स्पर्धांचे उद्घाटनही झाले. रमेश जोशी यांनी मनोगत व्यक्त केले. ऋषीकेश खाडे यांने सूत्रसंचालन तर अरुंधती जोशी हिने आभार मानले.

पतंग महोत्सव
संस्थेच्या कुलसप्ताह क्रीडा सप्ताहामध्ये एका नाविन्यपूर्ण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. संस्थेच्या शताब्दीनिमित्त शंभर पतंग एकाचवेळी आकाशात उडविण्याची स्पर्धा मकरसंक्रांतीच्या पूर्वसंध्येला 13 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता सदाशिव पेठेतील स्काऊट ग्राऊंडवर होणार आहे. यामध्ये लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच वयोगटातील स्पर्धक सहभागी होणार आहेत. तरी पुणेकरांनी या कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.