हैदराबाद । सौदी अरबमध्ये राहणार्या एका व्यक्तीने भारतात राहणार्या आपल्या पत्नीला चक्क दैनिकात जाहिरात देऊन तलाक दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संबंधित महिलेने आपल्या पती आणि सासरच्या मंडळीवर फसवणूक आणि पिळवणुकीचे आरोप लावले. एकीकडे तिहेरी तलाक रद्द करण्यासाठी महिला आवाज उठवत असतानाच आता दैनिकात जाहिरात देऊन तलाक दिल्याने संताप व्यक्त होतोय.
हैदराबादच्या 25 वर्षीय महिलेने जानेवारी 2015 मध्ये सौदी अरब येथे काम करणार्या मोहम्मद मुश्ताकुद्दीन याच्याशी विवाह केला. लग्नानंतर काही काळ सौदी अरबमध्ये राहिल्यानंतर गेल्या महिन्यातच हे जोडपे आपल्या 10 महिन्यांच्या बाळासह भारतात परतले. काही दिवसांत मुश्ताकुद्दीन कामानिमित्त परत सौदी अरबला निघून गेला.
महिलेने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, पती सौदीला जाताच सासरच्या मंडळींना तिला घरातून हाकलून लावले. आपल्या आई-वडिलांच्या घरी राहत असताना दोन दिवसांपूर्वी मुश्ताकुद्दीनच्या वकिलांनी तिला एक उर्दू दैनिक पाठवले. या दैनिकात मुश्ताकुद्दीनने संबंधित महिलेला तलाक दिला, अशी जाहिरात होती. मोहम्मद मुश्ताकुद्दीनने पत्नीकडे याआधी 20 लाख रुपयांची मागणी केली होती. ज्यामुळे तिचा छळ केला जात होता. मोहम्मद मुश्ताकुद्दीन सौदी अरबला निघून गेल्यानंतर सासरच्यांनीही महिलेला घरातून हाकलले आहे.
कुराणानुसार आधी तलाक दिल्यानंतर व्यक्तीला आपल्या या निर्णयावर विचार करण्यासाठी तीन महिन्यांचा वेळ देण्यात येतो. यानंतरही जर तो आपल्या निर्णयावर कायम असेल, तर अजून दोन वेळा तलाक बोलल्यास तलाक दिला असे मानले जाते. अनेक इस्लामिक देशांमध्ये ही परंपरा बंद करण्यात आली आहे. मात्र, भारतात अद्यापही या प्रथेचे पालन केले जाते.