भुसावळ : दैनिक जनशक्तिच्या खान्देश आवृत्तीचे कार्यकारी संपादक शेखर पाटील व निलेश पाटील यांचे वडील रामा देवचंद पाटील यांच्या पार्थिवावर आज दुपारी भुसावळमधील तापी नदी काठावरील वैकुंठधामात शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. पत्रकारीतेसह राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील विविध संस्था-संघटनांचे पदाधिकारी रामा पाटील यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. रामा पाटील यांचे वृध्दापकाळामुळे सोमवारी रात्री 12.55 वाजेच्या सुमारास निधन झाले, ते 82 वर्षांचे होते.
स्नेहीजनांनी स्मृती जागवल्या
रेल्वेच्या नोकरीतून सेवानिवृत्त झाल्यानंतर रामा पाटील यांचे वास्तव्य भुसावळातील विद्यानगरात होते. मानवी आयुष्यात डोळस श्रद्धेचा तटस्थ समीक्षक अशी रामा पाटील यांची हयातभर समाजात ख्याती होती. सगळ्यांनी जीवलगासारखे सदैव सोबत असावे, आपपरभाव कुठेच नसावा; ही शिकवण त्यांनी स्वत:च्या आचरणातून सर्वांनाच दिली होती. या तटस्थ मनोभूमिकेतूनच त्यांनी आपल्या अखेरच्या काळात कुटुंबियांना माझ्या मृत्यूचा शोक करू नका, असे बजावलेले होते. त्यांच्या याच मनोभूमिकेतल्या असंख्य आठवणी अंत्यविधीनंतरच्या शोकसभेत समाजातील विविध स्तरांमधील त्यांच्या स्नेहीजनांनी जागवल्या.