दोंडाईचात पेट्रोलपंप चालकांकडून मापात पाप!

0

दोंडाईचा (जयपालसिंग गिरासे) । दोंडाईचा प्रतिलिटर 10% या प्रमाणात पेट्रोलमध्ये ईथेनॉलचे प्रमाण असतांना दोंडाईचा शहरातील पेट्रोल पंपचालकांनी ईथेनॉलच्या नावाने मापात पाप करत ग्राहकांची लुट चालविली आहे. हा प्रकार शहरातील बहुतेक पंपावर होत असुन ग्राहक व पंपचालक यांच्यात रोज वाद होत असुन हाणामारीपर्यंन्त प्रकरण जात आहेत. लग्नकार्यांचा हंगाम चालु असल्याने अनेकांसोबत कुटुंब असते याचाचा गैरफायदा घेत पंपचालक वाद करायला उभे ठाकतात. अनेकांना पेट्रोलमध्ये फसवणुक झाल्याचे लक्षात आल्यांवर सुध्दा काही ग्राहक वेळेअभावी तर काही बाहेर गावाचे असल्याने शासन दरबारी तक्रार करीत नाहीत. तर अनेकांचा तक्रार करून देखील काही उपयोग होत नाही असा प्रशासनावर आरोप आहे.

ईथेनॉलमुळे गोंधळ की मापात पाप…
शहरात अनेक दिवसापासुन पेट्रोलमध्ये पाणी निघत असल्याची ग्राहकांची तक्रार आहे. दोनशे ते तीनशे रूपयाचे पेट्रोल वाहनात भरल्यास अर्धा ते पाऊन लिटर पाणी निघते असे ग्राहक म्हणतात तर पेट्रोल पंप चालकांच्या म्हणण्यानुसार व इंडियन ऑईल चे अधिकार्‍याकडून माहिती घेतली असता प्रतिलिटर 10 टक्के या हिशोबाने पेट्रोलमध्ये ईथेनॉलचे प्रमाण असते यापेक्षा अधिक ईथेनाल नसते. मात्र शहरातील पंपचालक ईथेनॉलच्या नावाने मापात पाप करीत आहेत. पेट्रोलमध्ये पाणी येत असल्याने वाहनांच्या मेंन्टन्समध्ये वाढ झाली आहे. तो भुर्दंड ग्राहकांना बसत असल्याने नेमके पेट्रोलमध्ये ईथेनॉल की पाणी का मापात पाप यांची चौकशी व्हावी अशी मागणी ग्राहकांकडून होत आहे.

पेट्रोलपंपावर सुविधांचा अभाव…..
प्रथमोपच्चार पेटी, पंपावर हवा, पिण्यासाठी शुध्द व थंड पाणी, महिलांसाठी स्वतंत्र शौचालय, पुरूषांसाठी प्रसाधन गृह या सुविधा पंप चालकांसाठी बंधनकारक असतांना शहरातील पंपावर ग्राहकांना या सुविधा मिळत नाहीत. अनेकांनी शौचालयांना कुलुप लावले आहेत. तर पंपावरील एअर कॉम्प्रेशर, वॉटर कुलर बंद अवस्थेत आहेत. शौचालयामध्ये घाण असुन पाण्याची व्यवस्था नाही.

नेमके वादाचे कारण….
शहरात पंप चालक लिटरच्या हिशोबात पेट्रोल टाकत नाहीत. सुटे पैश्याचे कारण दाखवत पंप चालक पन्नास, शंभर, दोनशे रूपये या हिशोबाने व राऊंन्ड फिगरचा बहाणा करून पेट्रोल टाकतात. यात प्रति शंभर रूपयाच्या पेट्रोलमध्ये आठ ते दहा रूपयांचे पेट्रोल कमी मिळत असल्याचा ग्राहकांचा आरोप आहे. यामुळे मोटारसायकलचा अ‍ॅव्हरेज बसत नसल्याने ग्राहक पंपचालकांशी वाद घालतात. अनेक वादाचे पर्यावसन हाणामारीपर्यंन्त जाते. तर पंपचालकांनी मुद्दामच गुन्हेगारी प्रवृत्तीचे कर्मचारी ठेवल्याचे आरोप ग्राहकांकडून होत आहे.

स्वाईप मशीन नसल्याने अनेकांची गैरसोय…
डिजीटल युगाची सुरुवात झाली असतांना तसेच मा. नरेंद्र मोदीजी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डिजीटल व्यवहारासाठी चालना दिली असुन सगळ्या ठिकाणी कॅशलेश व्यवहाराला प्राथान्य दिले जाते. मात्र शहरातील बहुतेक पंप चालकांकडे स्वाइप नशीन नसल्याने वेळी अवेळी गैरसोय होते. बाहेरून आलेल्या व्यक्तीला पर्यायच नसतो. यामुळे स्वाइप मशीन बसविण्याची मागणी होत आहे.

बिल देण्यासाठी टाळाटाळ….
पेट्रोल भरल्यावर पेट्रोलचे बील मागितल्यास कर्मचार्‍याकडून टाळाटाळ केली जाते. कधी बील बुक छापायला टाकले आहे. तर कधी प्रिंटर खराब आहे. किंवा बिल पाहीजे असल्यास थोडा वेळ थांबावे लागेल अशी उडवाउडवीची उत्तरे देत बील देण्यासाठी टाळाटाळ केली जाते. अनेक कर्मचारी अरेरावीची भाषा करीत असुन ग्राहकांची बीलच्या विषयावरून खिल्ली उडवितात.

ग्राहक संघटना नावालाच….
शहरात ग्राहकांच्या हितार्थ अनेक संघटना काम करतात त्यात अनेक सदस्य हे स्वतः व्यापारी आहेत. एकमेकांच्या व्यवसायातील त्रुटी लक्षात घेत हे पदाधिकारी हितसंबध जपतात असा आरोप जनतेतुन होत आहे.

कार्यवाहीची मागणी…
शहरातील पेट्रोल पंप चालकांची मनमानी अनेक दिवसापासुन चालु असतांना स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनिधी दखल घ्यायला तयार नाहीत. तक्रारदारालाच शासकीय अधिकारी आरोपीच्या पिजर्‍यांत उभे करतात व मग्रुरी दाखवत तक्रार न करण्याची सुचना वजा धमकी देतात. यामुळे अनेकांनी माघार घेतली याचाच फायदा घेत पंपचालक काळाबाजार करीत असल्याचे सांगण्यात येते. तर सरकारी पगार घेवुन पंपचालकांची गुलामी करणार्‍या अधिकारीची देखील चौकशी व्हावी अशी मागणी होत आहे.