दोंडाईचात भरदिवसा धूमस्टाईल चोरी

0

दोंडाईचा। दोंडाईच्यात भरदिवसा दुपारी तीन वाजता दोन मोटरसायकलसवार अज्ञात चोरटयांनी एका शेतकर्‍याचा हातातील पिशवी हिसकावून वीस हजार रुपयांची रोकड लंपास केली. शहरातील मध्यवर्ती भागात भर दुपारी ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

मोटरसायकलस्वार चोरांनी पैसे केले लंपास
सविस्तर माहिती अशी की, दोंडाईचा शहरात दुपारी तीनच्या सुमारास देगाव येथील शेतकरी छत्रसिंग दादाभाई गिरासे (65) यांनी आपल्या क्राफ्ट लोनचे 50 हजार रुपये युनियन बँकच्या खात्यातून काढून घरी जाण्यासाठी निघाले. त्यातील तीस हजारच्या नोटा लहान असल्याने खिशात ठेवल्या तर पन्नासच्या वीस हजार रुपयांची रोकड पिशवीत घेवून शहरातील एका दुकानात गेले. तेथून निर्मल एम्पोरीयमच्या रस्त्याने जाताना वाटेत मागून दोन मोटारसायकलवर आलेल्या चोरट्यांनी धूमस्टाईलने येत गिरासे यांच्या हातातील पिशवी हिसकावून शहरातील मध्यवर्ती भागातून पसार झाले.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरटे कैद
यावेळी एका तरूणाने त्यांचा पाठलाग केला पण मोटारसायकल वेगाने असल्याने चोर पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन दोंडाईचा पोलीस ठाण्यात पीआय मुंडे व एपीआय आशिष खांडेकर हे का शेख यांनी घटनास्थळी जाऊन चोरटयांचे सीसीटीव्ही फुटेज मिळवले आहेत. दोंडाईचा पोलीस ठाण्यात संध्याकाळी उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते. शहरातील वारंवार चोरीचे सत्र सुरू असून पोलिसांचा धाक संपल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.