दोंडाईचा कत्तलखाना सील करण्याची कारवाई योग्य

0

दोंडाईचा । 2010 पासून वादाचा विषय असलेल्या आणि अनेक सामाजिक संघटना, पक्ष यांचा विरोध झुगारून दोंडाईचा पालिकेच्या तत्कालीन सत्ताधारी गटाने बांधलेला अद्यावत मशिनरीयुक्त कत्तलखाना पालिकेची सत्ता मिळाल्यानंतर भाजपाने पहिल्याच सर्वसाधारण सभेत सर्व करार रद्द करून 2 मार्च रोजी पालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी रोहिदास वारुळे यांनी आपल्या कर्मचारी सोबत जाऊन कत्तलखाना सील केला होता. त्याचदिवशी कत्तलखाना चालविणार्‍या तापी व्हॅली कंपनीने याबाबत मनाई हुकूम साठी अर्ज केला होता. त्यावेळी न्यायालयाने दाव्यावर अंतिम निर्णय होईपर्यंत जैसे थे परिस्थिती ठेवण्याचे आदेश केले होते, परंतु या दाव्यावर अंतिम सुनावणी होऊन 13 रोजी दोंडाईचा येथील दिवाणी न्यायालयाने अंतिम निर्णय देत पालिकेने कत्तलखाना सील करण्याची कार्यवाही योग्य ठरवीत कत्तलखाना बंद करण्याचा मार्ग मोकळा केला आहे.

देशमुख गटाला जबर हादरा
पालिकेच्या या निर्णयामुळे माजी मंत्री डॉ. हेमंत देशमुख गटाला जबर हादरा बसला आहे. डॉ देशमुख गटाने कत्तलखाना चालविण्यासाठी तापी व्हॅली कंपनीस 30 वर्ष भाडे कराराने दिला होता. तो करार अखेर रद्द ठरला आहे. डॉ. हेमंत देशमुख यांच्या गटाची सत्ता असतांना सर्वे नं. 123 मध्ये अद्यावत मशिनारीयुक्त कत्तलखाना बांधला आहे. पालिका सभागृहाला केवळ 3 वर्षाचा करार करण्याचा अधिकार असल्याचा मुद्दा पालिकेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत उपस्थित करून सत्ताधारी भाजपाच्या नगरसेवकांनी हा करार रद्द करण्याचे सूतोवाच केले होते. त्यानुसार 1 मार्च 2017 रोजी झालेल्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत या कत्तलखान्याच्या संबधीत सर्व करार रद्द करण्यात आले होते. भाजपची सत्ता पालिकेत स्थापन झाल्यानंतर कत्तलखाना बंद करण्याबाबत शहरातील विविध सामाजिक संघटना यांची बैठक व्यापारी भवन येथे झाली होती. त्यावेळी सर्व संघटनानी कत्तलखाना बंद करण्याची एकमुखी मागणी पालिकेकडे केली होती.