दोंडाईचा । वापी ते चोपडा एसटी महामंडळाच्या बस वरील वाहकास दि.12 रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास दोंडाईचा बस स्थानकात बस प्रवेश करत असतांना बस स्थानकाजवळ बसलेल्या दोन व्यक्तींनी शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना घडली. दरम्यान याप्रकरणी दोघं संशयितांविरूद्ध दोंडाईचा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना ताब्यात घेतले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की गुजरातहून वापी डेपोची बस क्रमांक एम एच 20 बी एल 3103 ही चोपडा जात असतांना दोंडाईचा येथील बसस्थानकात प्रवेश करत होती. यावेळी बसस्थानका जवळ विक्की उर्फ विवेक अजय निकवाडे, प्रताप राजाराम भोई हे त्यांची इंडीका कार लावून चहा पित होते. दरम्यान बस चालक स्वप्निल पाटील हे बस पार्किंग करत असतांना संशयितांनी आमच्या गाडील धक्का लागला तर विचार करा असे म्हणज शिवीगाळ देण्यास सुरवात केली. तर वाहक राजेंद्र पाटील यांना कॉलर पकडून मारहाण केली. याप्रकरणी वाहक राजेंद्र गंगाराम पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोंघावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.