दोंडाईचा बाजार समितीच्या ऑनलाईन कापूस नोंदणीला प्रतिसाद

0

शिंदखेडा:उपनिबंधक यांच्या मार्गदर्शनानुसार आणि दोंडाईचा बाजार समितीचे सभापती नारायण पाटील यांच्या नियोजनानुसार दोंडाईचा बाजार समितीने ऑनलाईन कापूस नोंदणी केली होती. त्यास शिंदखेडा तालुक्यातील शेतकरी बांधवानी प्रतिसाद दिला आहे. सकाळी 11 ते 5 वाजेपर्यंत तब्बल 2 हजार 600 शेतकर्‍यांनी ऑनलाईन नावाची नोंदणी केली आहे. अशी ऑनलाईन नोंदणी करणारी खान्देशातील दोंडाईचा बाजार समिती पहिलीच बाजार समिती ठरली असल्याची माहिती दोंडाईचा बाजार समितीचे सभापती नारायण पाटील यांनी दिली.

जगभरात कोरोना आजाराने थैमान घातले असून धुळे जिल्हाही रेड झोनमध्ये आला आहे. शिवाय बाम्हणे व शिरपूर या ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. अशा परिस्थितीत सर्व व्यवहार बंद असल्याने कापूस उत्पादक शेतकर्‍यांचा कापूस घरातच पडून आहे. त्यामुळे शेतकरी बांधव संकटात आहे. यावर केंद्र सरकारच्या सीसीआयमार्फत कापूस खरेदी करावी, असे आदेश बाजार समितींना आले होते. त्या अंतर्गत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंट ठेवून नोंदणी करावी, असे जिल्हाधिकार्‍यांनी सूचित केले होते.

परंतु काही राजकारणी मंडळी त्यातही राजकारण करण्याची संधी शोधत आहेत. त्यांनी बाजार समितीवर आरोप करत ऑफलाइन नोंदणी करावी, अशी मागणी केली. परंतु दोंडाईचा बाजार समितीने शेतकर्‍यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने, सोशल डिस्टंट पाळण्यात यावे, यासाठी हा निर्णय घेतला आहे. त्या तुलनेने शिरपूर बाजार समितीने ऑफलाइन नाव नोंदणी केली. त्याठिकाणी शिरपूर तालुका व शिंदखेडा तालुका या दोन तालुक्यांतील शेतकर्‍यांनी नाव नोंदणी करूनही 4 दिवसात केवळ 1200 नावे नोंदली गेली आहेत. शिवाय शिरपूर तालुक्यात कोरोना रुग्ण आढळल्याने ऑफलाइन नोंदणीही बंद झाली आहे. परंतु दोंडाईचा बाजार समितीत सोमवारपर्यंत नाव नोंदणी सदैव सुरू राहणार आहे. शिवाय पुढेही सुरू केली जाईल. त्यामुळे शेतकर्‍यांनी घाबरून न जाता घरी बसूनच अर्ज भरावा, असे आवाहन दोंडाईचा बाजार समितीचे सभापती नारायण पाटील यांनी केले आहे.

सीसीआय, जिनिंगच्या मागणीनुसार कापूस खरेदी
ऑनलाईन नावे नोंदणी केल्यानंतर केंद्र शासनाच्या सीसीआयच्या गाइडलाईननुसार प्रतिक्षा यादीनुसार निपक्षपणे कोणतीही वशिलेबाजी न करता शेतकरी बांधवांना त्यासाठी बोलाविले जाईल. जिनिंगच्या मागणीप्रमाणे कापूस खरेदी केली जाईल, अशीही माहिती नारायण पाटील यांनी दिली.