दोंडाईचा । शहरातील शिवाजी पुतळ्याजवळ असलेल्या श्रध्दा एजन्सी या दुकानाला रात्री भीषण आग लागली. या आगीत मोबाईल फोन,पान मसाला, झेरॉक्स मशिनसह फर्निचर जळून खाक झाले असून 2 लाखांचे नुकसान झाले आहे. दोंडाईचा शहरापासून जवळ असलेल्या दाऊळ ता.शिंदखेडा येथे राहणार्या गणेश सुभाष पवार (वय 32) या व्यापार्याचे दोंडाईचा शहरातील शिवाजी पुतळ्यापासून जवळच असलेल्या जीनवाला कंपाऊंडमध्ये श्रध्दा एजन्सी नावाचे दुमजली दुकान आहे. श्रध्दा एजन्सीच्या माध्यामातून गणेश पवार हे मोबाईल, पान मसाला विक्री आणि झेरॉक्सचा व्यवसाय करतात. रात्री 9 वाजता दुकान बंद करुन ते घरी गेले. रात्री 10.30 ते 11 वाजेच्या सुारास दुकानाला भीषण आग लागली. दुकानातून मोठ्या प्राणात धुर निघत असल्याचे या मार्गावरुन जाणार्या लोकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिस स्टेशन,अग्निशामक दल आणि दुकान मालकाला फोन वरुन माहिती दिली. दरम्यान 9 बंबाच्या मदतीने लागलेली आग विझविण्यात आली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. या आगीमुळे 1 लाख 83 हजार रुपयांचे दुकानचालकाचे नुकसान झाले आहे. दुकान मालक गणेश पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन दोंडाईचा पोलिसांनी नोंद केली असून तपास हे.कॉ.बी.आर.कदम करीत आहेत.