दोंडाईचा वसतिगृहातील गृहपालांचे अखेर निलंबन

दोंडाईचा : बस स्थानकाजवळील शासकीय वसतिगृहातील विद्यार्थिनीने ओढणीच्या साह्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सायंकाळी पाच वाजता उघडकीस आली. वैशाली तापीदास गावीत (19, पिंपळे, ता.नवापूर) असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. आत्महत्येचे स्पष्ट कारण कळू शकले नाही. दरम्यान, ही घटना घडल्यानंतर वसतिगृहाचे गृहपाल या जागेवर उपस्थित नसल्याने तसेच घटना घडल्यानंतरही वेळेवर उपस्थित नसल्याने त्यांना निलंबीत करण्यात आले आहे.

आत्महत्येचे कारण अस्पष्ट
ती शहरातील अहिंसा पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगच्या प्रथम वर्षाची परीक्षा देत होती. वस्तीगृहातील एका मुलीच्या निदर्शनास ही घटना आली. तिने लगेच कनिष्ठ लिपिक कैलास धनगर यांना कळवले. त्यांनी गृहपाल रीना जाधव यांना माहिती कळवली मात्र जाधव या धुळे येथे टपाल देण्यासाठी गेल्याने रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी पोहोचल्या नव्हत्या त्यामुळे चांगलाच संताप व्यक्त करण्यात आला.

अखेर वसतीगृहातील गृहपाल रीना जाधव निलंबित
घटना घडली त्यावेळी गृहपाल रीना गिरीधारीलाल जाधव या घटनास्थळी नव्हत्या. घटनेबाबत त्यांना कळविण्यात आल्यानंतर देखील रात्री उशिरापर्यंत त्या घटनास्थळी न आल्यानंतर नातेवाईकांसह उपस्थितांनी तीव्र संताप व्यक्त केला. या बाबीची दखल घेत प्रकल्प अधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या सहाय्यक जिल्हाधिकारी तृप्ती घोडमिसे यांनी प्रभारी गृहपाल यांच्यावर कर्तव्यात कसुर केल्याचा ठपका ठेवत गृहपाल रीना जाधव यांचे अखेर निलंबीत केले आहे.