धुळे। धुळ्यातील अवैध धंदे, गुन्हेगारी रोखण्यासाठी नेमलेली दोन पोलिस पथके त्यांच्या कर्तव्यात सपशेल अपयशी ठरल्याने या पथकांना जिल्हा पोलिस प्रमुख एम. रामकुमार यांनी आज जोर का झटका दिला. भ्रष्टाचाराची कीड लागलेली ही पथके हप्तेखोरीमध्ये गुंतल्याचे वर्तमानपत्रांमधून प्रसिध्द्ध होत होते. पथकांबद्दलच्या तक्रारींची दखल घेवून जिल्हा पोलिसप्रमुखांनी आज कठोर पाऊल उचलले. ही पथके तडकाफडकी बरखास्त केल्याचे सांगितले जात आहे. दोन पोलिस पथक बरखास्त केल्याच्या वृत्ताला खुद्द जिल्हा पोलिस प्रमुख एम.रामकुमार यांनी दुजोरा दिला आहे. धुळे शहरासह जिल्ह्यातील सट्टा,जुगाराचे अड्डे, सोशल ्क्लबच्या नावाखाली सुरु असलेले भलतेच धंदे, रॉकेल, डिझेलची हेराफेरी यासह गुन्हेगारी रोखण्यासाठी अप्पर पोलिस अधीक्षक, डीवायएसपी यांची खास पथके असतात. अप्पर पोलिस अधीक्षक आणि डीवायएसपी यांच्या मार्गदर्शनाखाली ही पथके काम करीत असतात. अनेक गुंतागुंतीच्या गुन्ह्यांची उकल करण्यामध्ये या पथकांचा मोठा वाटा असतो. मात्र, या वरिष्ठ अधिकार्यांना अंधारात ठेवून पथकातील काही जणांनी गेल्या काही दिवसांपासून वेगळ्याच ‘वाटां‘वर जाणे सुरु केल्याचे बोलले जात होते.
पदाचा दुरूपायोग करून भ्रष्टाचार केला असल्याची तक्रार
अप्पर पोलिस अधीक्षक, डीवायएसपी यांच्या पथकाने गुन्ह्यांतील उकलींच्या कामगिरीऐवजी भलत्याच कामगिरींची चर्चा होऊ लागली. या पथकातील सर्वच जण पापामध्ये वाटेकरी होते, असे म्हणणे धाडसाचे ठरेल. ज्यांना वाटेकरी व्हायचे नव्हते ते बिचारे भ्रष्टांच्या वाटेवरुन वेगळे झाले. मात्र, पाप लपत नसते, हप्तेखोरीने चाटवलेल्या पथकातील महाभागांनी दिवसेंदिवस आपला वाटा वाढविण्यासाठी उपद्रव सुरु केला. त्यांच्या हप्तेखोरीने इमानदार कर्मचार्यांना काम करणे अवघड झाले होते. इमानदार कर्मचार्यांची मुस्कटदाबी करण्यात येत असल्याची चर्चा आहे. जिल्ह्यातील अवैध धंदे थांबविण्यासाठी पथकाची स्थापना करण्यात आली होती. परंतु, यापथकातील काही कर्मचार्यांनी आपल्या पदाचा दुरूपायोग करूर भ्रष्टाचार केला असल्याचे जिल्हा पोलिस प्रमुखांकडे तक्रार करण्यात आली होती.
जिल्हा पोलिस प्रमुखांचा दणका
या उपद्रवांचे किस्से वरिष्ठांपर्यंत पोहचू लागले. थेट जिल्हा पोलिसप्रमुखांकडे तक्रारी गेल्या. या तक्रारींची दखल घेत आज जिल्हा पोलिस प्रमुखांनी या भ्रष्टांना दणका दिल्याचे बोलले जात आहे. दोन्ही पथके तडकाफडकी बरखास्त करण्यात आली आहेत. लवकरच अप्पर पोलिस अधीक्षक आणि डीवायएसपींची नवीन पथके नेमण्यात येतील. या पथकांमध्ये जुन्या पथकातील काही इमानदार पोलिस कर्मचारी नक्कीच असतील, असेही बोलले जात आहे. नवीन पथकांनी तरी अवैध धंदे आणि गुुन्हेेगारी रोखावी, अशी अपेक्षा सर्वसामान्य जनता व्यक्त करीत आहे.
अप्पर पोलिस अधिक्षक आणि डीवायएसपी यांच्या पथकांची कामगिरी समाधानकारक नव्हती. त्यांच्या कामगिरीचा आढावा घेवून आज दोन्ही पथके बरखास्त केली.
एम.रामकुमार
पोलिस अधीक्षक, धुळे जिल्हा